कोल्हापूर : नवरात्रौत्सव संपला तशी आता थंडीची चाहूल लागली आहे. दिवसा आॅक्टोबर हीटचा तडाखा आणि संध्याकाळनंतर थंडी जाणवू लागली आहे.दिवाळी आणि थंडीचे खास समीकरण आहे. नवरात्रौत्सव संपला की थंडीला सुरुवात होते. दसऱ्यानंतर ग्रामीण भागात सोनं पुरुन जमिनीची पूजा केली जाते. त्यानंतर रब्बी पिकाचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर पुढील तीन महिन्यांचा कालावधी हा थंडीचा असतो. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाला आहे; त्यामुळे थंडीची तीव्रताही जास्त असणार आहे.आॅक्टोबर महिना संपत आला, तरी आॅक्टोबर हीटचा तडाखा अजून सुरू आहे. दिवसभर कडक ऊन असते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सायंकाळनंतर वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. थंडीत दिवस लहान आणि रात्र मोठी असते, त्यामुळे सायंकाळी सहा वाजताच अंधार पडू लागला आहे.
रात्री साडेआठ नऊ नंतर दुचाकी वाहनावरून जाताना थंडी जाणवते. पहाटेच्यावेळी ती अधिक जाणवते. शिवाय सकाळी धुके दाटून येतात; त्यामुळे आता कपाटात ठेवलेले स्वेटर्स, कानटोपी, स्कार्फ, मोजे बाहेर यायला सुरुवात झाली आहे.
फिरायला येणाऱ्यांची गर्दी..थंडीच्या दिवसात वातावरण अधिक आल्हाददायक आणि आरोग्यदायी असते. सकाळी सकाळी धुकं आणि बोचऱ्या थंडीत फिरण्याचा आनंद काही औरच असतो; त्यामुळे एरवी फिरायला जायला कंटाळा करणारेही सकाळी फिरायला बाहेर पडत आहेत.