प्रवीण देसाई
कोल्हापूर : जिल्हयातील संभाव्य पाणीटंचाईचा विचार करता पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनांतर्गत विंधन विहिरींसाठी जिल्हयातून ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाले आहेत. लवकरच हे मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. यावर शहानिशा होऊन प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय घेतल्यानंतरच त्याला मंजुरी दिली जाणार आहे.संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या कालावधीत पाणीटंचाई निवारण कृती आराखडा उपाययोजनेंतर्गत ग्रामस्तरावरून माहिती घेतली जाते. त्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक, जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक, कार्यकारी अभियंता यांच्या माध्यमातून पाहणी करून तो प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो.
ही पाहणी करताना संबंधित गावांत चौदाव्या वित्त आयोगातून पाणीपुरवठ्या संदर्भातील कोणते काम झाले आहे का हे पाहिले जाते. त्यानंतर त्या गावात पाण्यासाठी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे ते पाहिले जाते.
यामध्ये उदा. विंधन विहिरी, विहिरींचा गाळ काढणे व खोलीकरण, खासगी विहिरी अधिग्रहण करणे, नळ पाणीपुरवठा योजना विशेष दुरुस्ती करणे, टॅँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे आदींचा यामध्ये समावेश आहे.
यंदा संंबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून विंधन विहिरींसाठीचे ३३ प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केले आहेत. हे प्रस्ताव परिपूर्ण करून जिल्हा परिषदेने मान्यतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवायचे आहेत.
लवकरच ते येणे अपेक्षित आहे. हे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर खरोखर संबंधित गावात पाणीटंचाई आहे का? तसेच त्या ठिकाणी कोणती उपाययोजना अपेक्षित असून ती निकषांत बसते का हे पाहिले जाणार आहे. त्याचबरोबर संंबंधित प्रांताधिकाऱ्यांकडून अभिप्राय घेऊनच जिल्हाधिकारी त्याला मंजुरी देणार आहेत.
तालुके प्रस्तावहातकणंगले ६भुदरगड ४गडहिंग्लज ४कागल ६राधानगरी ६गगनबावडा २चंदगड २आजरा १करवीर २
जिल्हाधिकारीच घेणार निर्णयपाणीटंचाईसंदर्भात जिल्हा परिषदेकडे विंधन विहिरींसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे येणार आहेत. त्यावर शहानिशा करून आवश्यकता असल्यास या प्रस्तावांना मंजुरी जिल्हाधिकारी देणार आहेत. त्याचे सर्वाधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.