कोल्हापूर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला कलकत्ता येथील एका भाविकाने सोमवारी तब्बल एक किलो सोन्याचा किरीट अर्पण केला. हिरे आणि माणिकाच्या जडावाने घडवलेला हा किरीट देवीला अलंकार पूजेदरम्यान चढवण्यात आला.या किरीटावर नाग, लिंग, योनी ही श्री अंबाबाईच्या मूळ मूर्तीवरील चिन्हे असून, किरीटाची किंमत आजच्या बाजारभावानुसार ३२ लाख रुपये आहे. कलकत्ता येथील या भक्ताने आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर स्वत: येऊन हा किरीट देवीला अर्पण केला व गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
महेंद्र ज्वेलर्सचे संचालक भरत ओसवाल यांनी हा किरीट घडवला आहे. देवस्थान समितीच्या वतीने या भाविकाचा व भरत ओसवाल यांचा सत्कार करण्यात आला. देवस्थान समितीच्या इतिहासात प्रथमच देवीला असा दागिना अर्पण झाला आहे, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.