कोल्हापूर : वळीवडे (ता. करवीर) येथील गोपालधाम अपार्टमेंन्टचे तिसऱ्या मजल्यावरील खोलीत भारत व बांगलादेश फाईनल क्रिकेट सामन्यावर सुरु असलेल्या बेटींग अड्डयावर गांधीनगर पोलीसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. संशयित राकेश लालचंद नागदेव (वय ३३, रा. कोयना कॉलनी, गांधीनगर), सागर संजय तहसीलदार (२४, रा. श्रीरंग अपार्टमेंन्ट, महाडीक कॉलनी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे ताब्यातून रोकड, लॅपटॉप, मोबाईल असा सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
संशयित सागर तहसीलदार हा एसटी गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार याचा भाऊ आहे. त्याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. भाऊ स्वप्निलच्या जोरावर त्याने अवैध व्यवसायामध्ये पाय रोवले आहेत. बेटींगवरील कारवाईने एजंटांचे धाबे दणाणले आहेत.
अधिक माहिती अशी, संशयित राकेश नागदेव व सागर तहसीलदार हे दोघेजण स्वत:च्या फायद्यासाठी दि. २८ सप्टेंबरला दुबई येथील आशिया चषक क्रिकेट मधील भारत व बांगलादेश फाईनल सामन्यामधील बॅटींग करणारे खेळाडू त्यांचे होणारे धाव संखेवर तसेच फिल्डींग करणारे खेळाडू, सामना कोण जिंकणार यावर फोनद्वारे व आॅनलाईनद्वारे बेटींग घेत होते.
हा जुगार वळीवडे येथील गोपालधाम अपार्टमेंन्टचे तिसºया मजल्यावरील फलॅट नंबर ३०१ मध्ये सुरु असलेची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना समजली. त्यांनी सहकार्यांसमवेत रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला असता संशयित ग्राहकाकडून रक्कमांची बोली स्विकारुन त्या रक्कमाचे हिशोब लॅपटॉपमध्ये ठेवत असताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून एलईडी टिव्ही, सेटअप बॉक्स, एक लॅपटॉप, पंधरा मोबाईल, कॅलक्युलेटर, सुटकेस असा सुमारे सव्वा लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.