कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक येथे कागल-कोल्हापूर एसटी बसमधून उतरत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने प्रवाशाच्या खिशातील १ लाख ३८ हजार रोकड हातोहात लंपास केली. ही घटना रविवारी (दि. ७) दुपारी एकच्या सुमारास घडली.अधिक माहिती अशी, मल्लीकार्जुन काडाप्पा पाटील (वय ४६, रा. बागेवाडी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) हे शेती करतात. त्यांना जुनी कार विकत घ्यायची होती; त्यासाठी कोल्हापुरातील मित्राला त्यांनी कार बघण्यास सांगितले होते. रविवारी मित्राने त्यांना फोन करून कार बघितली आहे.
कोल्हापूरला येताना थोडेफार पैसे घेऊन या, असा निरोप दिला. कार खरेदीसाठी त्यांनी उसाचे जमा झालेले बिल १ लाख ३८ हजार रुपये बँकेतून काढून घेतले. कागल-कोल्हापूर एसटी बसमधून मध्यवर्ती बसस्थानक येथे आले. बसला गर्दी असल्याने उतरताना प्रवाशांची खेचाखेची झाली होती.
खाली उतरल्यानंतर त्यांनी खिसा चापचून बघितला असता, तो कापलेला दिसला. त्यातील रक्कम गायब होती. रक्कम चोरीला गेल्याने ते भांबावून गेले. आजूबाजूला शोध घेतला असता, रक्कम मिळून आली नाही. हताश झालेल्या पाटील यांनी शाहूपुरी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.
रोकड चोरीला गेल्याने त्यांचे कार खरेदीचे स्वप्न अधुरेच राहिले. ते रिकाम्या हाताने माघारी गावी परतले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.