कोल्हापूर : कांद्याच्या दरातील घसरणीने राज्यभरातील महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये गोंधळ सुरू असताना, कोल्हापूर बाजार समितीत मात्र गेल्या चार दिवसांपासून कांद्याची आवक आणि दरही स्थिरच आहे. साधारणपणे दररोज ४५ गाड्यांची आवक असून, दरही सरासरी ८ ते ९ रुपये प्रतिकिलो असे आहेत.राज्यभर मातीमोल दराने कांदा विकावा लागत असल्याने, शेतकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मिळालेल्या दरातून वाहतुकीचाही खर्च निघत नसल्याने कांदा फेकून देण्यासह फुकट वाटण्याचेही प्रकार काही बाजार समित्यांसमोर घडले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर बाजार समितीचा आढावा घेतला असता, चार दिवसांपासून दर व आवकेत कोणताही चढउतार नसल्याचे समितीच्या सूत्रांनी सांगितले.कोल्हापूर जिल्हा हा कांदा उत्पादक नसला, तरी येथे सौद्याला चांगला दर मिळत असल्याने कर्नाटक, सोलापूर, नाशिक, सांगली या भागांंतील कांदा उत्पादक सौद्यासाठी कोल्हापुरात येतात.
१५ दिवसांपूर्वी अचानक दर कमी झाल्याने सौदे बंद पडले होते; त्यानंतर मात्र सौदे सुरळीत सुरू असून, आतापर्यंत त्यात काही व्यत्यय आलेला नाही. शनिवारी आवक वाढते; पण दररोज सरासरी ४५ गाड्या येतात. गुरुवारीही ४ हजार ५२२ क्विंटल कांद्याची आवक झाली. याचा सौदा चार ते १२ रुपये प्रमाणे निघाला. सरासरी दर ८ ते ९ रुपये प्रतिकिलो असा राहिला.