कोल्हापूर : भाजीपाला व कांद्याच्या दरात घसरण सुरू असून घाऊक बाजारात लाल भडक टोमॅटोचा दर सहा रूपये किलो पर्यंत खाली आला आहे. साखर, तुरडाळ व हरभरा डाळींच्या दरातील घसरण थांबण्याचे नाव घेत किरकोळ बाजारात तुरडाळ ६३ रूपयांपर्यंत आली आहे.स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने बाजारात भाज्यांची गर्दी झाली आहे. कोबीचा दीड किलोचा गड्डा अवघ्या दहा रूपयाला मिळत आहे. एरव्ही ३०-४० रूपयांना मिळणारा पांढरा शुभ्र प्लॉवरचा दर दहा रूपये झाला आहे. गेले आठवड्यापेक्षा कोबी व प्लॉवरच्या दरात पाच रूपयांची घसरण झाली आहे.
वांग्याचे दर तुलनेने स्थिर असून घाऊक बाजारात सरासरी १५ रूपये किलो दर असला तरी किरकोळ बाजारात मात्र ३० ते ४० रूपयेच मोजावे लागत आहेत. सगळ्या वाईट अवस्था टोमॅटोची झाली असून लाल भडक टोमॅटो घाऊक मध्ये ३ ते ६ रूपये किलो झाला आहे. ओली मिरचीच्या दरातही थोडी घसरण झाली आहे.
गवारची आवक थोडी मंदावल्याने या आठवड्यात दर तेजीत आहे. ओला वाटाणा, कारली, भेंडी, दोडक्याचे दर सरासरी ४० रूपये किलो राहिले आहेत. कोथंबीरची आवक स्थिर राहिल्याने दरात फारशी चढउतार दिसत नाही.कांद्याची आवक थोडी वाढत असून दर कमी होत आहेत.
घाऊक बाजारात १० ते २५ रूपये किलो पर्यंत दर राहिला आहे. गेले आठवड्यापेक्षा किलो मागे आठ रूपयांची घट झाली आहे. बटाटा व लसणाच्या दरात चढउतार नाही. गूळाची आवक स्थिर आहे, क्विंटल मागे ५० ते १०० रूपयांची दरात घसरण दिसते.फळमार्केट मध्ये द्राक्षे, माल्टा, चिकूची आवक जोरात सुरू आहे. बाजार समितीत रोज एक हजार बॉक्स द्राक्षांची आवक होत असून घाऊक बाजारात सरासरी ३० रूपये दर असला तरी किरकोळ बाजारात अजूनही ७०-८० रूपयेच ग्राहकांना मोजावे लागतात. कलिंगडेची आवक सुरू झाली असून येत्या आठ -दहा दिवसात बंगलोर, धारवाड, हुबळी येथून आवक वाढण्याची शक्यता आहे.
पौर्णिमेमुळे भाज्यांना मागणीमंगळवारी येणाऱ्या पौर्णिमेला ग्रामीण भागातील भाविक मोठ्या प्रमाणात सौदंत्ती यात्रेला जातात. नैवेद्यासाठी वांग्यासह पालेभाज्या लागत असल्याने त्याची मागणी थोडी वाढली आहे. पण आवकही तेवढीच असल्याने दरात चढ-उतार दिसत नाही.
एक किलोचा पेरू!यंदा पेरूची आवक मोठ्या प्रमाणात आहे. शिरोळ सह सांगली जिल्ह्यातून पेरूची आवक सुरू असून शिरोळ तालुक्यातील एका शेतकऱ्यांने तब्बल एक किलो वजनाच्या पेरूचे उत्पादन घेतले आहे. त्याची आवक बाजार समितीत झाली असून साधारणता या पेरूची किंमत शंभर रूपये आहे.