कोल्हापूर : सरकारकडूनमराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता त्याच्या दाखल्यांच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ‘आपले सरकार’ केंद्रांमधून आॅनलाईनद्वारे दाखल्यांच्या नोंदणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. सेवा हमी कायद्यानुसार ४५ दिवसांत दाखला देणे बंधनकारक आहे; परंतु हे काम युद्धपातळीवर करून किमान आठवड्याभरात हा दाखला देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी सुरू आहे.मराठा समाजाला जाहीर झालेले आरक्षण हे नोकरी व शिक्षणासाठी आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांमधून आॅनलाईनद्वारे या दाखल्यांसाठी अर्ज करण्याची सुविधा असल्याने जिल्ह्यातील या केंद्रांवर मराठी तरुणांची दाखल्यांसाठी लगबग सुरू होती.
दाखल्यासाठी आॅनलाईन अर्जासोबत १९६७ पूर्वीचा मराठा असल्याचा पुरावा म्हणजे आजोबा, वडील व स्वत:चा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला, तत्कालीन रहिवासी पुरावा, स्वत:च्या ओळखीचा पुरावा असलेले पॅन कार्ड, रेशन कार्ड, आदी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे. त्यानंतर हा दाखल डेस्क- १ कारकून, डेस्क- २ नायब तहसीलदार / तहसीलदार व डेस्क- ३ प्रांताधिकारी या स्तरांवर सह्या होणे अशी दाखला मिळण्याची प्रक्रिया आहे.
प्रांताधिकाऱ्यांच्या अंतिम सहीनंतर हा दाखला दिला जातो. मराठा दाखल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. वास्तविक कोणताही दाखला हा ४५ दिवसांच्या आत द्यावा, असे सेवा हमी कायदा सांगतो. तरीही मुलांच्या शिक्षणासह नोकरीसाठी हे दाखले अत्यावश्यक असल्याने ते लवकरात लवकर मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नोंदणीनंतर संबंधित अर्जदाराला हे दाखले आठवड्याभरात मिळणार आहेत.