कोल्हापूर : त्र्यंबोलीदेवीच्या आषाढ महिन्यातील यात्रेसाठी यंदा ३ आणि १० आॅगस्ट हे दोनच दिवस मिळणार आहेत. आषाढी एकादशीनंतर ही यात्रा सुरू होते. मात्र त्यानंतरच्या शुक्रवारी आणि मंगळवारी पौर्णिमा, अंगारकी संकष्टी चतुर्थी, पंधरवड्यातील एकादशी आल्याने शेवटच्या दोन शुक्रवारी यात्रेचा धडाका उडणार आहे.दरवर्षी आषाढ महिन्यात त्र्यंबोली देवीची यात्रा होते. या महिन्यातील मंगळवारी आणि शुक्रवारी पंचगंगा नदीला आलेले नवे पाणी मिरवणुकीने नेत ते त्र्यंबोली देवीला अर्पण केले जाते. त्यानिमित्त गल्ली, पेठांमध्ये तरुण मंडळांच्या वतीने वर्गणी काढली जाते. यंदा शनिवार (दि. १४)पासून आषाढ महिना सुरू होत आहे.
पुढील आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार मिळत असला तरी आषाढी एकादशीनंतर आणि गुरुपौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने त्र्यंबोली यात्रेला सुरुवात होते. यंदा आषाढी एकादशी २३ तारखेला आहे. दुसऱ्याच दिवशी मंगळवार असून, त्या दिवशी काही प्रमाणात यात्रा होऊ शकते. त्यानंतरच्या शुक्रवारी गुरुपौर्णिमा आणि मंगळवारी (दि. ३१) अंगारकी संकष्ट चतुर्थी आली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात त्र्यंबोली यात्रेची शक्यता नगण्य आहे.
आॅगस्ट महिन्यातील ३ तारखेचा शुक्रवार यात्रेसाठी मिळणार आहे. त्यानंतरच्या मंगळवारी (दि. ७) एकादशी आहे. त्यामुळे १० आॅगस्ट हा यात्रेचा अखेरचा दिवस असणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता अमावास्या लागणार आहे. त्यामुळे यंदा कोल्हापूरकरांना त्र्यंबोली देवीच्या यात्रेसाठी दोनच दिवस मिळणार आहेत.
वर्गणीच्या पाट्यायात्रेला उशीर असला तरी गल्लोगल्ली, पेठापेठांमध्ये वर्गणीच्या पाट्या लागल्या आहेत. यंदा २०० ते २५० रुपये वर्गणी ठरली असून, सदर रक्कम मंडळाकडे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.