कोल्हापूर : रिक्षा, शेअर-ए-रिक्षा व काळी-पिवळी टॅक्सी यांचे थांबे नव्याने निर्माण करावेत यासह परमिट खुले करावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांना निवेदन देण्यात आले.यात गेल्या चार वर्षांपासून रिक्षा, शेअर-ए-रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी यांचे थांबे कमी केले आहेत. वाढलेली लोकसंख्या व वाहने लक्षात घेता नवीन थांब्यांसंदर्भात बैठक घ्यावी. यासह जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी परमिट खुले करावे. गॅसकिट नूतनीकरण प्रमाणपत्र बंगलोर येथून आणले जात होते. त्यातही हे कार्यालय अडवणूक करीत आहे.
ही सोय कोल्हापुरातही व्हावी. रिक्षा व टॅक्सीचालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची स्थापना करावी. पासिंग ट्रॅकवर अधिकाऱ्यांकडून वाहनधारकांना नाहक त्रास दिला जात आहे. त्याकडेही लक्ष देऊन अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात.रिक्षांचा विमाही रिक्षाचालकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. त्यामुळे राज्य शासनानेच विमा महामंडळ स्थापन करावे. त्यातून कमी दराची वाहन विमा योजना राबवावी. काही टेम्पो ट्रॅव्हलर, मॅक्सीकॅब परमिटधारकांना बोगस कागदपत्रांद्वारे परमिट मिळविले आहे, असे सांगून त्यांना टी. पी. देणे अधिकाऱ्यांनी बंद केले आहे, आदी मागण्यांचा समावेश होता.यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी येत्या दोन दिवसांत परिवहन प्राधिकरणाची बैठक बोलावली जाईल. त्यात रिक्षाथांब्याबाबत निर्णय घेऊ. यासह मोरेवाडी येथील पासिंग ट्रॅकवर लवकरच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांच्या पासिंगची सोय केली जाईल, असे आश्वासन दिले.यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोसले, राजू जाधव, दिनेश परमार, दिलीप सूर्यवंशी, योगेश रेळेकर, सचिन निकम, योगेश शिंदे, श्रीकांत सोनवले, अवधूत खोत, उत्तम भुरावणे, किशोर कांबळे, भूषण गराडे, सोमनाथ ओतारी, तानाजी भोसले, नागेश बुचडे, राजू सांगावकर, राजू भोसले, दत्ता राऊत, काका मोहिते, अजित चौगले, उत्तर रड्डे, आदी उपस्थित होते.