कोल्हापूर : आधुनिक शेतीचा मंत्र घेऊन तपोवनच्या मैदानावर भरलेल्या सतेज कृषी प्रदर्शनाचे शुक्रवारी थाटात उद्घाटन झाले. सोमवार (दि. ३१) पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात शेती सुलभ करणाऱ्या अत्याधुनिक यंत्रे व अवजारांची रेलचेल आहे. देशी-विदेशी भाज्या, जातिवंत पशुपक्ष्यांसह बांबूची सायकल आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.कळंबा जेलसमोर तपोवनच्या विस्तीर्ण मैदानावर भरलेल्या सतेज कृषी पशू प्रदर्शनात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे तंत्र अवगत करणाऱ्या अत्याधुनिक कृषी अवजारांवर अधिक भर देण्यात आला आहे. लहान-मोठे ट्रॅक्टर, पॉवर टिलरसह फवारणी पंपाचे असंख्य प्रकार प्रदर्शनात उपलब्ध आहेत.घरच्या घरी शेंगदाण्यापासून तेल काढणाऱ्या लहान पोर्टेबल घाण्यासह गृहोपयोगी वस्तूंचीही प्रदर्शनात रेलचेल आहे. सिंगल फेजवर चालणारे लहान आकाराचे पूर्णपणे सुरक्षित कडबा कुट्टी यंत्र प्रदर्शनात विशेष लक्ष वेधत आहे. यात दोन प्रकारे वैरण बारीक करता येते.शेती विभागात १४ किलोंचा भोपळा, चिनी कोबी, प्लेट्युस, तेलताड, गॅलन जातीचे वांगे, बाणवली जातीचे नारळ विशेष लक्ष वेधून घेत आहेत. बांबूपासून निर्मिती केलेल्या अनेक वस्तू येथे पाहावयास मिळत आहेत. याशिवाय बांबूची रोपेही उपलब्ध आहेत.
बांबूपासून तयार केलेली सायकल, फर्निचरसह अनेक शोभेच्या वस्तू आहेत. पशुपक्षी विभागात कोकणी देशी गाईसह नांदेडची कंधारी, दावणी, खिलारी गाई, बैल, वळू आहेत. खाद्यपदार्थ विभागात बचत गटांद्वारे निर्मित शाकाहारी मांसाहारी पदार्थांसह फास्ट फूडचे स्टॉल रसिक खव्वयांची दाद मिळवत आहेत.
दत्त कारखान्याचा स्टॉलउसाचे एकरी १५० टन आणि खोडव्याचे उच्चांकी उत्पादन घेण्याचा मान मिळविणाऱ्या शिरोळच्या दत्त सहकारी साखर कारखान्याने आपले हे तंत्र अन्य शेतकऱ्यांना कळावे यासाठी माहिती देणारा स्वतंत्र स्टॉल प्रदर्शनात मांडला आहे.
शेतकऱ्यांचा गौरवप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यात जिल्हा परिषद, जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय, कृषी महाविद्यालयासह राज्यस्तरावर भात, सोयाबीन पीक स्पर्धेत विजय मिळविलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेतीशाळा, फूलशेती, हरितगृह, आदींमध्ये नावलौकिक मिळविलेल्या शेतकºयांनाही गौरविण्यात आले.