कोल्हापूर : विद्यार्थ्यांसाठी दिला जाणाऱ्या शालेय पोषण आहाराची तब्बल १४०० टन तांदळाची पोती मार्केट यार्ड परिसरातील बाबा ट्रेडिंग कंपनीच्या गोदामाबाहेर ठेवल्याचा प्रकार मंगळवारी स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला. या ठिकाणी छापा आंदोलन करुन उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या येथील ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांला कार्यकर्त्यांनी चोप दिला.दुपारी साडे बाराच्या सुमारास संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी गोदामाच्या ठिकाणी छापा आंदोलन केले. या ठिकाणी तांदळाची पोती उघड्यावर असल्याचे दिसून आले.
याबाबत कार्यकर्त्यांनी येथील व्यवस्थापनासाठी असलेल्या कर्मचारी रजनीकांत बुलबुले यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा सचिन तोडकर व कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिला.बाबा ट्रेडिंग कंपनी ही लातूरची असून त्यांच्याकडे जिल्ह्यातील शालेय पोषण आहाराचा ठेका आहे. कंझ्युमर फेडरेशनच्या माध्यमातून पोषण आहाराचा तांदूळ घेऊन तो जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील साडेचार लाख विद्यार्थ्यांना पुरविला जातो.
अशा प्रकारे उघड्यावर तांदूळ ठेवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करावी. तसेच या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे असे सचिन तोडकर यांनी पत्रकारांना सांगितले.
बुलबले यांनी आम्ही जर वेअर हाऊस मधून या महिन्याचे धान्य उचलले नसते तर ते लॅप्स झाले असते. त्यामुळे हे धान्य गोदामात उतरविले आहे. पूर्वीचे धान्य शिल्लक असल्याने हे काही धान्याची पोती बाहेर ठेवली आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून परवानगी घेतल्याचे सांगितले.