कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या प्रदुषणास कारणीभुत ठरल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने राज्य विद्युत वितरण कंपनीस नोटीस देऊन महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीचा गुरुवारी एक तास विद्युत पुरवठा खंडीत केला. ही कारवाई प्रतिकात्मक असून यापुढे फौजदारी कारवाई होऊ शकते असा इशारा मंडळाने दिला आहे.गेल्या काही महिन्यापासून शहरातील मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असून त्यामुळे नदीच्या खालच्या बाजूकडील गावातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तसचे जलचरांना धोका निर्माण झाल्यामुळे गुुरुवारी ही कारवाई झाली.
बुधवारी महाराष्ट्र राज्य प्रदुषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीचा विद्युत पुरवठा एक तासाकरीता खंडीत करण्याची नोटीस दिली.
शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार व विजय देवणे यांना ही माहिती कळताच त्यांनी महावितरणच्या शहर विभागाच्या अतिरीक्त कार्यकारी अभियंता आर. एस. काळभोर यांना भेटून नियंत्रण मंडळाच्या नोटीसप्रमाणे महानगरपालिकेचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा आग्रह धरला. सर्वसामान्य ग्राहकांची कनेक्शन लागलीच तोडता तर मग या कारवाईला विलंब लावू नका असे पवार यांनी सांगितले.काळभोर हे पवार, देवणे यांच्यासह महानगरपालिका चौकात पोहचले. नोटीसमध्ये दिलेल्या वेळेनुसार सकाळी साडे अकरा ते साडे बारा यावेळेत मुख्य प्रशासकीय इमारतीचा विद्युत पुरवठा खंडीत केला. महापालिका कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडीत होताच तात्काळ जनरेटर सुरु केले. त्यामुळे प्रशासकीय कामात कुठे अडथळा आला नाही.असाही योगायोगमहावितरणचे अधिकारी व कर्मचारी विद्युत पुरवठा खंडीत करण्यास महापालिका चौकात पोहचले त्यावेळी पालिकेत नूतन महापौर स्वाती यवलुजे व उपमहापौर सुनिल पाटील यांचा समारंभपूर्वक कार्यालय प्रवेश सुरु होता. अशीच एक कारवाई २००३ मध्ये झाली त्यावेळी सुनिल कदम महापौर म्हणून कार्यालय प्रवेश करत होते. गुरुवारी असाही एक योगायोग जुळून आला.