कोल्हापूर : दिवसेंदिवस महागाईत भर घालणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ शनिवारी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (गवई गट)तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी महागाईसह पेट्रोल, डिझेलचे दर कमी करावेत यासह विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्या अशा, अनुसुचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्ध्यांची २०१६-१७ सालापासूनची शिष्यवृत्ती त्वरीत देण्यात यावी व त्यामध्ये सध्याच्या महागाई निर्देशांकाप्रमाणे वाढ करावी.
दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई कमी करावी, पेट्रोल, डिझेलची दरवाढ कमी करावी, वीजेची दरवाढ कमी करावी, ग्रामीण भागातील गायरान जमिनीमधील रहीवाशी वापरत असलेली अतिक्रमणे ठरविलेली सर्व घरे नियमित करावीत, गिरगाव व गोकुळ शिरगाव येथील रहीवाशी अतिक्रमन कायम करावे, रमाबाई घरकुल योजनेतील अनुदान रक्कम ग्रामीण भागासाठी २.५० लाख रुपये व शहरी भागासाठी ५ लाख रुपये प्रमाणे वाढवून मिळावी. संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील अनेक गरीब कुटूंबाची पेन्शन अनुदान बंद करण्यात आली आहे. ती पूर्ववत सुरु करावी.आंदोलनात पी. एस. कांबळे, भाऊसाहेब काळे, सतीश माने, तुकाराम कांबळे, नाथाजी कांबळे, बाजीराव गायकवाड, दशरथ कांबळे, भगवान कांबळे आदी सहभागी झाले होते.