कोल्हापूर : वीज दरवाढीविरोधात उद्योजक महामोर्चा काढून राज्यव्यापी आंदोलन सुरू करणार आहेत. त्याची दिशा मुंबई येथे दि. २० डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना सहभागी होणार आहेत. या संघटनांनी शुक्रवारी (दि. १४) आयोजित केलेले रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी या औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी घेतला.या सर्व औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधी यांची बैठक कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात झाली. राज्यभरातील उद्योजक संघटितपणे वीज दरवाढीविरोधात आंदोलन करणार आहेत.
या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दि. २० डिसेंबरला मुंबई येथील महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स येथे राज्यव्यापी औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची व्यापक बैठक होणार आहे. त्यामुळे कोल्हापुरातील रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
महामोर्चा काढण्यात येणार असून त्याची तारीख आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर आणि ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील यांनी दिली.
यावेळी इंजिनिअरिंग असोसिशनचे अतुल आरवाडे, बाबासो कोंडेकर, कमलाकांत कुलकर्णी, ‘गोशिमा’चे लक्ष्मीदास पटेल, ‘मॅक’चे गोरख माळी, ‘आयआयएफ’चे सुरेश चौगुले, सुमित चौगुले, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे प्रदीपभाई कापडिया, धनंजय दुग्गे, शिवाजीराव पोवार, कोल्हापूर उद्यम को-आॅप. सोसायटीचे अशोकराव जाधव, जयदीप मांगोरे, आदी उपस्थित होते.