कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या आरक्षीत जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई न केल्याने संतप्त शिवसैनिकांनी गुरुवारी दुपारी महासभेवेळी प्रशासनाचा निषेध नोंदवत महापालिकेवर मोर्चा काढत निदर्शने केली.तावडे हॉटेल ते गांधीनगर मार्गावर धनदांडग्यांनी, पैशाच्या जोरावर कायदा पायदळी तुडवून महपालिकेच्या आरक्षीत केलेल्या जागेवर अवैद्यरित्या अतिक्रमणे करुन इमारती बांधण्यात आल्या आहेत. राज्यातील सर्वच अतिक्रमणे हटविण्याचे धोरण राबविण्याच्या सुचना उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आहेत. तरीही महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाची कारवाई केली नसल्याचा शिवेसेनेच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला.
या निषेधार्थ शिवसेनेने पापाची तिकटी येथून मोर्चा काढला. मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले. मोर्चा महापालिकेभोवती फिरुन मुख्य प्रवेशद्वारासमोर आल्यानंतर तीव्र निदर्शने करण्यात आली.आंदोलकांनी हातात भगवे झेंडे, गळ्यात भगवे स्कार्प घालून जयभवानी-जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, शेपुट घालणाऱ्या प्रशसनाचा निषेध, आयुक्तांचा निषेध असो अशा घोषणा दिल्या. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पोलिसांनी मोर्चा आडविण्यात आल्यानंतर येथे निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.मोर्चात शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, सुजीत चव्हाण, रवि चौगुले, राजू यादव, हर्षल सुर्वे, दत्ताजी टिपूगडे, अवधूत साळोखे, शशि बिडकर, कमलाकर जगदाळे, शुभांगी पोवार, सुजाता सोहनी, दिपाली शिंदे आदींचा सहभाग होता.
सामान्यांची अतिक्रमणे काढल्यास चोख उत्तरमहापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या सुचनांचे पालन करावे अन्यथा भविष्यात कोणत्याही सर्वसामान्याच्या अतिक्रमणावर कारवाई करणाºयाना शिवसेना चोख उत्तर देईल, परिणामाची जबाबदारी सर्वस्वी महापालिका प्रशासनाची असेल असाही इशारा संजय पवार यांनी यावेळी दिला.