कोल्हापूर : ‘ईपीएस ९५’ पेन्शनधारकांना जोपर्यंत पेन्शनवाढ मिळत नाही, तोपर्यंत सत्ताधारी पक्षाला देशातील पेन्शनधारक मतदान करणार नाहीत, असा निर्णय सर्व श्रमिक संघ, महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना, निवृत्त कर्मचारी समन्वय समिती, सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी संघटना, आदींच्या पुणे येथे झालेल्या राज्यपातळीवरील बैठकीत घेण्यात आला.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य सर्व श्रमिक महासंघाचे सरचिटणीस उदय भट होते. एकजुटीने प्रश्न मार्गी लावण्यासाठी देशातील चार संघटना एकत्रित आल्या आहेत. त्या संघटनामार्फत ५ जुलैला प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहेत. त्यावेळी खासदारांना मोर्चाला सामोरे जाण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीमध्ये २३ जणांची समिती स्थापन करण्यात आली. चार संघटनांनी एकत्रित मिळून देशातील पेन्शनबाबत कामकाज चालविण्यासाठी अतुल दिघे, सुभाष कुलकर्णी, प्रकाश येंदे, रमेश गवळी यांचे अध्यक्षीय मंडळ नेमण्यात आले. यावेळी अनंत कुलकर्णी, अप्पासाहेब बिडकर, श्रीकांत माने, गोपाळ पाटील, नाना जगताप, आदी उपस्थित होते, अशी माहिती सर्व श्रमिक संघाचे सचिव अनंत कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली.