कोल्हापूर : दीड लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी पोलीस हवालदार पांडुरंग बापू वरुटे (३४, रा. आरे, ता. करवीर) यांना प्रथमवर्ग न्यायाधीश झेड. झेड. खान यांनी तीन महिने कारावासाची शिक्षा व दीड लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.पांडुरंग वरुटे हे मुंबई रेल्वे पोलीसमध्ये हवालदार पदावर नोकरीस आहेत. ठाण्यात आहेत. त्यांनी पोलीस असल्याचा फायदा घेऊन हरीभाई धोंडिराम पाटील (रा. पाडळी, बुद्रूक, ता. करवीर) यांचेकडून उसणे दोन लाख रुपये घेतले होते. त्यापैकी ५0 हजार परतफेड करून १ डिसेंबर २०१६ रोजीचा फेड्रल बँकेचा दीड लाख रुपयांचा धनादेश हरीभाई पाटील यांना दिला. तो धनादेश बँकेत खाते बंद असल्याने परत आला.
आपली फसवणूक केल्याचे समजताच पाटील यांनी वरुटेच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली. न्यायाधीश खान यांनी हवालदार वरुटे यांना दोषी धरून तीन महिने साधी कैद व तक्रार पाटील यांना दीड लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून द्यावी, असा आदेश दिला. अंतिम सुनावणीच्या वेळी वरुटे हे न्यायालयात हजर नसल्याने त्यांना शिक्षा वॉरंट काढले. फिर्यादीच्या बाजूने अॅड. रणजित साळोखे यांनी काम पाहिले.