कोल्हापूर : यंदाचा कृषी महोत्सव डिसेंबर महिन्यात होत आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती, तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेला दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) यंत्रणेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी अमित माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. जे. खोत, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अशोक पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, जिल्ह्यात सध्या ५० शेतकऱ्यांचा ५० एकर क्षेत्राचा एक गट, असे ३० शेतकरी बचत गट कार्यरत असून, या गटातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर अधिक भर द्यावा. शेतकरी गटांनी यापुढील काळात सेंद्रिय शेतीवर भर देऊन अधिकाधिक उत्पादने घ्यावीत.डिसेंबर महिन्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतीचे प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, औजारे यांची माहिती तसेच सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार यावर भर देण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.बैठकीस भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक ऋषिराज गोस्की, रेशीम विकास अधिकारी बी. एम. खंडागळे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, मत्स्य व्यवसायाचे साहाय्यक आयुक्त पी. के. सुर्वे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, नियामक मंडळाचे सदस्य सर्जेराव पाटील, विश्वनाथ पाटील, बाळू चव्हाण, शंकर पाटील, मिनाक्षी चौगुले, तुंगभद्रा चरापले, आदी उपस्थित होते.