कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (केएसडीए) व नेताजी तरुण मंडळ यांच्यातर्फे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ २८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान शाहू स्टेडियम येथे ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेतील विजेत्या संघास ५, तर उपविजेत्या संघास तीन लाख रुपये रोख व आकर्षक चषक प्रदान केला जाणार आहे. अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व आमदार अमल महाडीक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक बक्षिसांची या स्पर्धेत विजेत्या उपविजेत्यांसह तृतीय व चतुर्थ क्रमांकास रोख ५० हजार, तर दुसऱ्या फेरीतून बाद होणाऱ्या संघास प्रत्येकी २० हजार रुपये दिले जाणार आहेत. यासह पहिल्या फेरीतून बाद होणाऱ्या संघास व फेअर प्ले संघास प्रत्येकी १० हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
स्पर्धेतील विविध फळीतील उत्कृष्ठ खेळाडूंना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा, तर मालीकावीरास ७५ हजार रुपयांचा सोन्याचा दागिना दिला जाणार आहे. स्पर्धेनिमित्त रविवारी दुपारी मोटरसायकल रॅली, तर सोमवारी (दि. २६) व मंगळवारी (दि. २७) ला कोल्हापूरातील ज्येष्ठ फुटबॉल पटूंचा उभामारुती चौक व बालगोपाल तालीम मंडळ परिसरात सत्कार केला जाणार आहे.
स्पर्धेचे उदघाटन बुधवारी (दि. २८) सांस्कृतिक कार्यक्रम व १६ संघांचे संचलन असा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धेतील सामने गुरुवारी (दि. २९) पासून सुरु होतील. अंतिम सामन्याचा बक्षिस समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे.पत्रकार परिषदेस नेताजी तरुण मंडळाचे राजू साळोखे, केएसडीएचे सुजय पित्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महापालिका स्थायी समिती सभापती अशिष ढवळे, नगरसेवक विजय सुर्यवंशी, संभाजी जाधव, विजयसिंह खाडे, अशोक देसाई, प्रदीप साळोखे, राजू राऊत, दिग्विजय मळगे, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, आदी उपस्थित होते.