कोल्हापूर : हेल्पर्स आॅफ दि हॅँडिकॅप्ड, कोल्हापूर संचालित समर्थ विद्यामंदिर आणि समर्थ विद्यालय, उचगाव पूर्व या शाळेच्या वतीने कवी विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वाचन आणि अभिनयातून विद्यार्थ्यांनी ‘विंदां’च्या बालकविता सादर केल्या.कोरगावकर लॉनमध्ये झालेय या कार्यक्रमाची संकल्पना शाळा समिती सदस्या व साहित्यिका रजनी हिरळीकर यांची होती. या कार्यक्रमासाठीचा विद्यार्थ्यांचा उत्साह व प्रयत्नांतून शाळेच्या चाकोरीबाहेर जाऊन जाणकार रसिक प्रेक्षक असलेल्या ज्येष्ठांसाठीच्या विरंगुळा केंद्रातील सदस्यांसाठी हा कार्यक्रम घेण्यात आला. सुचेता कोरगावकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. आपल्या समृद्ध मराठी साहित्य क्षेत्राचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, हा यामागील उद्देश होता.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कविता व कलांजली विद्यार्थी संघ, कोल्हापूर यांच्या सदस्यांनी गाइलेल्या विंदांच्या भावपूर्ण गीतांनी हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगला. काहींनी विंदांच्या त्यांना ज्ञात असलेल्या आणखी काही कविता सादर केल्या. यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला. विंदांच्या कविताविश्वाची आनंदमयी सफर अनुभवल्याची भावना घेऊन सर्वांनी निरोप घेतला.