कोल्हापूर : गरजूंच्या मदतीसाठी प्रतिज्ञा नाट्यरंगच्या वतीने आयोजित आनंदस्वर या शास्त्रीय गायन मैफलीत डॉ. आनंद धर्माधिकारी यांनी स्वत: रचलेल्या विविध रागातील निवडक बंदिशी सादर केल्या.
मंगळवारी पंडित गायत्री आठल्ये-पंडितराव यांची शास्त्रीय गायन मैफल रंगली. आज बुधवारी पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगीतिक जीवनाचा आणि सृजनात्मक कार्याचा आढावा घेणारी व सुधांशू नाईक यांचे सादरीकरण असलेली युगन युगन हम जोगी ही दृक-श्राव्य मैफिल होणार आहे.झोरबा हॉटेलच्या हॉलमध्ये रंगलेल्या कार्यक्रमात धर्माधिकारी यांनी राग भैरव, वृंदावनीसारंग, शुद्ध सारंग, यमन, भूप, भीमपलास, बागेश्री, चंद्रकंस, मालकंस, मारू बिहाग, मियाँ मल्हार, पटदीप या रागातल्या विविध बंदिशी सादर केल्या. या बंदिशींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. डॉ. धर्माधिकारी हे शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी विविध संगीत स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम केले आहे. कार्यक्रमात मंजिरी देवाण्णावर यांनी त्यांच्या रचनांविषयी मुलाखत घेतली.
यावेळी नितीन मुनीश्वर, रमा कुलकर्णी, गिरीधर कुलकर्णी, डॉ. विनोद ठाकूर-देसाई, शिवराज पाटील, गुरू ढोले, अमित साळोखे, सुधीर अलगौडर, प्रदीप कुंभार, विजयालक्ष्मी कुंभार, प्रतीक्षा लोंढे, उपस्थित होत्या. प्रशांत जोशी यांनी संयोजन केले. मैफिलीतून जमा होणारा निधी गरजू रुग्ण तसेच विद्यार्थी यांना देण्यात येणार असून रसिकांनी या मैफिलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.