कोल्हापूर : दूध दरवाढ न देणाऱ्यांवर कारवाई अन्यथा कार्यालयास टाळे, कॉँग्रेसचे सहायक निबंधकांना (दुग्ध) इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 04:24 PM2018-05-11T16:24:54+5:302018-05-11T16:24:54+5:30
शासनाच्या आदेशाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दरवाढ न देणाऱ्या संघांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू. असा इशारा कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहायक निबंधकांना (दुग्ध) दिला.
कोल्हापूर : शासनाच्या आदेशाप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध दरवाढ न देणाऱ्या संघांवर कारवाई करा, अन्यथा कार्यालयास टाळे ठोकू. असा इशारा कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने सहायक निबंधकांना (दुग्ध) दिला.
दूध दर कपातीबाबत शुक्रवारी संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी सी. के. कांबळे यांना निवेदन देण्यात आले. दूध व्यवसाय अडचणीत आल्याने शासनाने प्रतिलिटर तीन रूपयांची दूध दरवाढ करण्याचे आदेश संघांना दिले. पण अतिरिक्त दूधाचे कारण पुढे करत जिल्हा दूध संघांने गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रूपयांची कपात केली.
गेले सहा महिन्यात उत्पादकांचे ३५ कोटीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी तक्रार केल्यानंतर दुग्ध विभागाने केवळ नोटीसा काढून खुलासा मागितला आहे. शासकीय आदेशाला केराची टोपली दाखवणाऱ्या दूध संघावर थेट कारवाई करणे अपेक्षित होते.
कायद्याची अंमलबजावणी करणार नसाल तर केवळ संस्था नोंदणी करणे एवढेच काम या कार्यालयाचे आहे का? शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर योग्य कारवाई करणार नसाल तर दुग्ध कार्यालयास टाळे ठोकावे लागेल, असा इशारा संजय पाटील यांनी दिला. यावेळी करवीरचे सभापती प्रदीप झांबरे, जिल्हा परिषदेचे सदस्य बजरंग पाटील, बजरंग रणदिवे, योगेश हत्तलगे, तानाजी मोरे, संपत भोसले, उदय भोसले आदी उपस्थित होते.
मागण्या अशा :
- दूध दरवाढ आदेश डावल्याबद्दल दूध संघांवर फौजदारी दाखल करा.
- अतिरिक्त दूधाच्या नावाखाली खरेदी दरात कपात मग विक्री दर कमी का नाही.
- दूध संघावर प्रशासक नियुक्तीच्या नोटीसीचे काय झाले.