कोल्हापूर : बांधकाम कामगारांची बंद असलेली मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरूकरावी, यासह राज्यपातळीवरील मागण्या महिन्याभरात मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा सोमवारी बांधकाम कामगारांनी शाहूपुरीतील सहायक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढून दिला. त्याचबरोबर आयुक्तांच्या अधिकारातील मागण्या लवकर मान्य न झाल्यास ११ फेब्रुवारीपासून कामगार आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचाही निर्णय यावेळी झाला.
या ठिकाणी बांधकाम कामगारांच्या मागण्यांबाबत चालढकल करणाºया भाजपा सरकारसह मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.
वाळू उपसाबंदीमुळे ज्या कामगारांचे काम बंद आहे, त्यांना महिन्याला पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा, ६० वर्षांवरील बांधकाम कामगारांना महिन्याला पाच हजार रुपये पेन्शन द्यावी, घर बांधणीकरिता मंडळाकडून पाच लाख रुपये अनुदान द्यावे व पाच लाख रुपये बिनव्याजी कर्ज द्यावे, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर ‘सिटू’चा प्रतिनिधी घ्यावा, नोंदीत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला पाच लाख रु पये मदत द्यावी, बांधकाम कामगारांना घरपोच रेशन द्यावे, नोंदीत बांधकाम कामगारांना साहित्य खरेदीकरिता पाच हजारांचा लाभ द्यावा, आजरा, गडहिंग्लज, चंदगड व पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या दोन्ही विभागांमध्ये स्वतंत्र सहायक कामगार आयुक्त कार्यालय सुुरू करावे, नोंदीत बांधकाम कामगाराला, तसेच कामगारांच्या मुलीच्या लग्नाकरिता ५० हजार रुपये अनुदान द्यावे, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.आंदोलनात भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, प्रकाश कुंभार, संदीप सुतार, विजय राजिगरे, शिवाजी मोरे, कुमार कागले, आनंदा कराडे, कृष्णात खुटाळे, रत्नाकर तोरसे, विवेक काळसिंगे, आदींसह बांधकाम कामगार सहभागी झाले होते.
‘दादा’ पैसे आणता कुठून?पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रत्येकाला पैसे वाटत फिरत आहेत. ते हा पैसा आणतात कुठून? असा सवाल कॉ. चंद्रकांत यादव यांनी केला. प्रत्येकाला वाटायला पैसे आहेत, मग बांधकाम कामगारांच्या मेडिक्लेमसाठी आडकाठी का? अशी विचारणाही त्यांनी केली.