कोल्हापूर : फुलांच्या माळांनी सजलेल्या कळशी डोक्यावर घेतलेल्या कुमारिका-सुवासिनी , पी ढबाकचा गजर आणि अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी अशा उत्साही वातावरणात शुक्रवारी कोल्हापुरात त्र्यंबोली देवीची यात्रा संपन्न झाली.
यानिमित्त देवीचा डोंगर भाविकांच्या गर्दीने फुलला होता. दर शहरातील विविध भागातून निघालेल्या मिरवणूकांनी यात्रेत रंग भरले.
यंदा १२ आॅगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. आषाढातील शेवटच्या मंगळवारी (दि. ७ आॅगस्ट) एकादशी व शुक्रवारी (दि. १०) अमावास्या आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शहरातील भाविकांनी शुक्रवारी आपल्या जत्रा पूर्ण केल्या. सकाळपासूनच पेठापेठांमधील भाविक फुलांनी सजवलेल्या पाण्याचे कलश (घागरी) डोक्यावर घेऊन वाजतगाजत नदीवरून त्र्यंबोली टेकडीच्या दिशेने जात होते.
महिला, लहान मुलींनी डोक्यावर कलश घेतले होते. तरुण मुलांकडून गुलालाची उधळण केली जात होती. पारंपरिक वाद्य पी. ढबाकच्या तालावर सर्वजण त्र्यंबोलीच्या दर्शनाला जात होते. त्यामुळे संपूर्ण शहर यात्रामय झाले होते. शुक्रवारी शहरातील शिवाजी पेठ, हनुमान तालीम, मंगळवार पेठ, रविवार पेठ, रंकाळा परिसर, खंडोबा तालीम, गंगावेस, शुक्रवार पेठ, कदमवाडी, कसबा बावडा, लाईन बाजार या परिसरातील यात्रा उत्साहात पार पडल्या.
पोलीस मुख्यालयाची पालखी...पोलीस मुख्यालयातील पोलीस कर्मचारी अक्षय व्हरांबळे यांच्या घरातून पालखीला सुरवात झाली. तेथून त्र्यंबोली मंदिरात आरती झाल्यानंतर पोलिसांच्यावतीने पालखीला मानवंदना देण्यात आली. पोलीस वसाहतीत फिरून पालखी पुढे ड्रील शेडमध्ये आल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे यांच्या पत्नी, तसेच गृह पोलीस उपअधिक्षक सतीश माने यांच्या पत्नी व तत्कालीन पोलीस अधिक्षक प्रदीप देशपांडे यांच्या पत्नी अनुराधा देशपांडे यांनी देवीची ओटी भरली.