धामोड - राधानगरी धरण परिसरात सतत कोसळणाऱ्या संततधार पावसाने राधानगरी धरणाचे सात ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 11396 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे.
मध्यरात्रीपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढतच चालला असल्याने सध्या धरणाचे सातही दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. रविवारी (8 सप्टेंबर) सकाळी सात नंतरही परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून धरणाच्या सर्व्हिस गेटमधून पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाकडून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून कोळी लोकांनी वेळीच स्थलांतर करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोल्हापुराला पुराचा मोठा धोका संभावतो आहे.
मुंबई, कोकणात जोरधार; कोल्हापुरामध्ये पूरस्थिती
मुंबई, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ होऊन ती 37 फुटांवर पोहोचली आहे. महापुराची 39 फुटांची इशारा पातळी गाठण्यास अवघे दोन फूट शिल्लक राहिल्याने धास्तीने नागरिकांनी स्थलांतरास सुरुवात केली आहे. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती कायम असून एक गणेश भक्त वाहून गेल्याची घटना घडली.
कोल्हापूर जिल्ह्यातील 65 बंधारे पाण्याखाली गेल्याने 20 मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या तीन तुकड्यांना नदीकाठच्या गावांजवळ तैनात करण्यात आले आहे. नदीकाठच्या 129 आणि पूरबाधित 363 गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. कोयना धरणातून 41 हजार 888 क्युसेक विसर्ग केला जात आहे. कृष्णा व कोयना नद्यांना पूर आला आहे. सांगलीत कृष्णा नदीपातळी मंदगतीने कमी होत असली तरी पुराचा धोका अद्याप टळलेला नाही.
गोव्यात पावसाचा मारा जोरात सुरू असून पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडचिरोलीत अनेक मार्ग बंद सतत दुसऱ्या दिवशीही गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती कायम आहे. अनेक मार्ग बंद आहेत. गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे.