कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाल्याने जिल्हा परिषदेत सुटीदिवशीही केलेल्या तयारीवर आणि पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या उत्साहावर विरजण पडले.बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुंडे येणार होत्या. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत जिल्हा परिषदेला त्यांची भेट ठरली होती. शुक्रवारी दुपारी ३ वाजता हा निरोप मिळाल्यानंतर सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, सभापती यांना येण्याचे निरोप देण्यात आले.अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले. सौरऊर्जा यंत्रणेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्याचे ठरल्याने तेथेही तयारी सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत थांबून सादरीकरणासाठी बुकलेटही तयार करण्यात आली. त्यांची पहिलीच जिल्हा परिषद भेट असल्याने जिल्हा परिषदेच्या अडचणी आणि मागण्यांचे निवेदन तयार करण्यासाठी सर्व विभागांकडून प्रश्न आणि मागण्याही मागविण्यात आल्या व निवेदनेही तयार करण्यात आली.दुसऱ्या शनिवारची सुटी असली तरीही सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारी जिल्हा परिषदेत सकाळी साडेआठपासूनच उपस्थित होते, परंतु साडेआठच्या सुमारास पंकजा मुंडे यांचा दौरा रद्द झाल्याचा अधिकृत निरोप त्यांच्या स्वीय सहायकांनी दिला आणि सर्वांचाच हिरमोड झाला.
तातडीने चार कर्मचाऱ्यांनी सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सभापतींना फोन लावून कार्यक्रम रद्द झाल्याची माहिती दिली.
काही घरात, काही वाटेत, काही जिल्हा परिषदेतकार्यक्रम रद्द झाल्याचा निरोप मिळेपर्यंत काही सदस्य जिल्हा परिषदेत पोहोचले होते. काही वाटेतच होते, तर जवळचे काही सदस्य घरातच होते. त्यांना याबाबत निरोप मिळाल्याने बहुतांशी जण कोल्हापूरला आलेच नाहीत.
सीईओंनी घेतली आढावा बैठकसप्टेंबरमध्ये पंचायत राज समितीचा दौरा कोल्हापूरला होणार आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासून सर्व विभागांमध्ये त्याची तयारी सुरू आहे. अनायासे सर्व विभागप्रमुख उपस्थित असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्वांची आढावा बैठक घेऊन पंचायत राज समिती दौऱ्याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.