कोल्हापूर : गेल्या ११ महिन्यात कोल्हापूर जिल्हयातील विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळाच्या केवळ ४९ तक्रारी पोलिस दफ्तरी नोंद आहे. यापुर्वी दिवसाला पोलिस ठाण्यात एक -दोन अशा स्वरुपाच्या यायच्या. पण,कुटूंब कल्याण समितीने केलेल्या समुपदेशनामुळे तक्रारीचे प्रमाण कमी झाले असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना येथे सांगितले.शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याबाबत उमेशचंद्र मोरे म्हणाले, स्त्रीच्या शारिरीक व मानसिक छळाचे (भा.द.वि.स.कलम ४९८)तक्रारी मोठ्या प्रमाणात पोलिस ठाण्यात यायच्या. या तक्रारीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्देश काढले.
याचे अधिकार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला दिले. त्यानूसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अखत्यारित कोल्हापूर जिल्हयाकरिता कुटूंब कल्याण समिती एक आॅगस्ट २०१७ ला स्थापन झाली.
या समितीमध्ये पी.जी.मांढरे, पल्लवी कोरगांवकर व प्रा.हरि वनमोरे यांचा समावेश आहे. ही समिती संबधितांचे समुपदेशन करते, ते शक्य न झाल्यास प्रत्यक्ष परिस्थिती आणि पुरावा, जबाब घेते आणि त्याचा अहवाल एक महिन्यात आत पोलिस ठाण्यात किंवा न्यायालयात देते.
या अहवालानंतरच पोलिसात विवाहितेच्या शारीरिक व मानसिक छळाच्या तक्रार दाखल होते. आॅगस्ट ते डिसेंबर २०१७ अखेर पर्यंत पाच आणि एक जानेवारी २०१८ ते १४ जुलैअखेर ४४ अशा एकूण ४९ तक्रारी या स्वरुपाच्या दाखल झाल्या आहेत.