कोल्हापूर : गेल्या दीड वर्षांपासून थैमान घालत असलेला कोरोनाचा अदृष्य विषाणू आणि त्या विरोधात जिल्हा प्रशासनाने पहिल्या लाटेत दिलेला यशस्वी लढा, केलेल्या उपाययोजनांचा लेखाजोखा कोल्हापूर कोविड १९ प्रतिबंध या कॉफी टेबल बुक स्वरूपात उपलब्ध झाला आहे. राज्यासाठी अनुकरणीय ठरलेला मास्क नाही तर प्रवेश नाही यासह कोल्हापूर पॅटर्न कसा होता याची माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून मिळणार आहे. कोरोनावर जिल्हा माहिती कार्यालयाने प्रकाशित केलेले पुस्तक म्हणजे राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
गतवर्षी फेब्रुवारी- मार्चमध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला, एरवी डोळ्यादेखत दिसणाऱ्या कोणत्याही आपत्तीपेक्षा ही आपत्ती वेगळी होती, एका अदृष्य विषाणुशी सगळ्यांना लढायचे होते, सर्वसामान्य नागरिक ते अगदी आरोग्य यंत्रणा, जिल्हा, पोलीस प्रशासन, महापालिका, जिल्हा परिषदेपासून ते ग्रामपंचायती सगळ्यांसाठीच ही बाब नवीन होती. एकीकडे वैद्यकीय सुविधा वाढवणे, दुसरीकडे नागरिकांनी सुरक्षितता अबाधित ठेवणे, परस्थ नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांची सोय करणे अशा अनेक पातळीवर लढाया सुरू होत्या. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तर जिल्ह्यात सध्याप्रमाणे संसर्गाचे थैमान सुरू होते. मात्र या काळातही सगळ्या यंत्रणांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिबंधक व संसर्ग झाल्यानंतरदेखील वैद्यकीय सेवांचे योग्य पद्धतीने नियोजन केले. त्यामुळे संसर्गाची पहिली लाट लवकर आटोक्यात आणता आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरू केलेली मास्क नाही तर प्रवेश नाही या मोहिमेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक करून ती राज्यभर अंमलात आणली. याशिवाय जिल्हा प्रशासनाने यशस्वीपणे वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या याचे एकत्रिकरण, व दस्तऐवज म्हणजे हे कॉफी टेबल बुक आहे. जिल्हा नियोजन समितीने नावीण्यपूर्ण योजनांसाठी दिलेल्या निधीतून यू पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असून त्याचे लवकरच प्रकाशन करण्यात येणार आहे.
---
क्युआर कोडचा वापर
हे पुस्तक ११२ पानांचे असून त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे संदेश आहेत. या पुस्तकात क्युआर कोडचा वापर करण्यात आला आहे. हा कोड स्कॅन केला की संबंधित बातमीचा व्हिडिओ पाहता येणार आहे. या पुस्तकाचे संकलन व संपादन तत्कालीन माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले असून छायाचित्रे अनिल यमकर यांची आहेत. यासह माहिती कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी पुस्तकासाठी परिश्रम घेतले आहेत.
---
काय आहे पुस्तकात
एकही रुग्ण कोल्हापुरात नसताना खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या बैठका, अलगीकरण, विलगीकरणासाठी हॉल, शाळा, वसतिगृहांची संकलित केलेली माहिती इथपासून ते कोल्हापुरात आढळलेला पहिला रुग्ण, त्यांच्यावरील उपचार, मे-जूनपासून सुरू झालेला संसर्ग, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये झालेला कहर, त्यावेळी तातडीने घेतले गेलेले निर्णय, ऑक्सिजनबाबतची स्वयंपूर्णता, परजिल्ह्यातील नागरिकांची रेल्वेद्वारे पाठवणी, स्वॅब तपासणी लॅब, वाढवलेले बेड, शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण, खासगी रुग्णालयांवर वॉच, रुग्णांची लुबाडणूक होऊ नये म्हणून उचललेले पाऊल अशा सर्व बाबींचा, जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेली माहिती वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्यांची कात्रणे यांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.
---
फाेटो नं २८०६२०२१-कोल-कोरोना बुक
--