कोल्हापूर : माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाबाबत तात्काळ कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी दिले.कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन म्हमाणे यांना दिले.
थकीत वेतन तात्काळ द्या, संच निश्चिती दुरूस्त करून मिळावी, विमुक्त जाती-भटक्या जमताी आश्रमशाळांची संच निश्चिती आपल्या स्तरावरून करण्यात यावी. शालेय पोषण आहार किचन शेड उपलब्ध व्हावीत, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणे तात्काळ व्हावीत, शाळा सिध्दी ‘अ’ मानांकन अट रद्द करावी, नवीन नेमणूक झालेल्या शिक्षकांची शालार्थ आय. डी. त्वरीत मिळावेत, अशा मागण्या करण्यात आल्या.मिलींद पांगिरेकर यांनी स्वागत केले. शिक्षण उपसंचालक किरण लोहार, सिंधूदुर्गचे शिक्षणाधिकारी महेश जोशी, शिक्षण उपनिरीक्षक डी. एस. पोवार, उपशिक्षणाधिकारी बी. डी. टोणपे, किरण शिरोळकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड, संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, उपाध्यक्ष बी. आर. बुगडे, एस. एम. पसाले, एन. एच. गाडेकर आदी उपस्थित होते.-