कोल्हापूर : येथील ‘चिल्लर पार्टी’च्यावतीने रविवारी (दि. २८) सकाळी १० वाजता शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे बालमित्रांसाठी ‘द वाईल्ड’ या चित्रपटाचे मोफत प्रदर्शन होणार आहे.प्राणीसंग्रहालयात लहानाचा मोठा झालेला सिंह शेरखाँ, आपल्या मुलाला कधी न केलेल्या स्वत:च्या लढायांबद्दलच्या कथा सांगत असतो. या कथांना व तेथील वातावरणाला त्याचा मुलगा आर्यन कंटाळलेला असतो. एके रात्री तो प्राणी बचाव संघटनेच्या उघड्या ट्रकमध्ये जावून बसतो. ज्वालामुखी फुटलेल्या एका बेटावरील प्राणी सुरक्षितस्थळी नेण्याचे काम सुरू असते, तेथे हे ट्रक जात असतात.ट्रकमध्ये अडकलेल्या आर्यनला जाताना शेरखाँ पाहतो पण काही करू शकत नाही. संग्रहालयातील कचरा गोळा करणाऱ्या ट्रकमधून शेरखाँ व त्याचे मित्र लपून बाहेर पडतात. ज्वालामुखीच्या बेटावर पोहोचतात. या जंगलात मस्तवाल रानम्हशींची संघटना कार्यरत असते. ते आपले राज्य इथे प्रस्थापित करू पाहतात. त्यांच्या तावडीत आर्यन सापडतो. शेरखाँ मित्रांच्या मदतीने आर्यनला सोडवतो का हे पाहायला या, असे आवाहन ‘चिल्लर पार्टी’तर्फे करण्यात आले आहे.