कोल्हापूर : प्रत्येक विद्यार्थ्यांला क्रीडा प्रकाराची माहिती व्हावी यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे सोनतळी (ता. करवीर) येथे उन्हाळी व्यक्तिमत्व विकास निवासी शिबीराला शुक्रवारपासून सुरुवात झाली. शिक्षण मंडळ सभापती वनिता देठे यांच्या हस्ते व प्रशासन अधिकारी एस.के.यादव , वडणगेचे सरपंच सचिन चौगुले आदींच्या उपस्थिती या शिबीराचे उदघाटन झाले. शिक्षण मंडळाचे यंदाचे शिबीर हे तिसरे आहे.विद्यार्थ्यांना उन्हाळच्या सुट्टीत लेझीम, झांज या पारंपारिक खेळांची माहिती आणि त्यांची बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी व्यक्तिमत्व विकास निवासी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या ५० शाळांमधील सहावी वर्गात शिक्षण घेणारे सुमारे २२५ विद्यार्थ्यांची या उन्हाळी निवासी शिबीरासाठी निवड करण्यात आली. शुक्रवारी सकाळी प्रार्थना होऊन मॉर्निंग वॉक व त्यानंतर शिबीराचे उदघाटन झाले. दुपारी पारंपारिक खेळ आणि त्यानंतर विठ्ठल कोतेकर यांचे ‘पॉझिटिव्ह अप्रोच’ या विषयावर व्याख्यान झाले. रात्री मुलांनी चिल्लर पार्टीचा आस्वाद घेतला. यासाठी तंबु मारण्यात आले आहे.आज शनिवारी प्रार्थना, त्यानंतर मॉर्निंग वॉक, सकाळी ११ वा.जयसिंगपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांचे ‘मी कसा घडलो’ या विषयावर व्याख्यान होणारआहे. यावेळी मुलांना विविध खेळांच्या प्रात्यक्षिकांची माहिती देण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी दिलीप कुडतकर यांचे जीवन याविषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर दूपारी ४ वा. आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, महापौर स्वाती यवलूजे आदींच्या उपस्थितीत या शिबीराचा समारोप होणार आहे. यासाठी सचिन पांडव, रसूल पाटील, पर्यवेक्षक विजय पाटील आदी परिश्रम घेत आहेत.