संदीप आडनाईककोल्हापूर : आकाशगंगेचं अनेकांना कुतूहल असतं. ती कशी दिसते? तिचा रंग कसा? त्यात हालचाली कशा होतात? हे जाणून घेण्यासाठी सातत्याने चार वर्षे प्रयत्न करणाऱ्या कोल्हापुरातील हौशी छायचित्रकारांची तपस्या फळाला आली आहे. राधानगरी येथील निरभ्र आकाश शोधून त्यांनी मनसोक्त छायाचित्रे काढली आहेत.कोल्हापुरातील हौशी छायाचित्रकार शादाब शेख, सुनील लायकर, अमित पवार, अनिकेत जुगदार, इम्रान शेख, विकी कुंभार, अनिकेत गुरव, अविनाश कुंभार ही टीम छायाचित्रणासाठी कोल्हापूर परिसरात नेहमी भटकंती करत असते. परंतु, आकाशगंगेला आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी गेली चार वर्षे ही टीम धडपडत होती. अखेर राधानगरीत निरभ्र आकाश शोधून ही छायाचित्रे काढण्यात त्यांना यश आले आहे. २८ तारखेला पहाटे पाच वाजेपर्यंत सर्वांनी या निरभ्र आकाशाखाली ठिय्या मांडून हे छायाचित्रण केले आहे.चंद्र दिसेनासा झाला की पहाटे दोन वाजल्यानंतर काळ्या कुट्ट अंधारात स्वच्छ आकाशात ठरावीक हालचाली डोळ्यांना पुसट पुसट दिसत असतात. अशा वेळी कॅमेऱ्यात ३० सेकंद शटर स्पीड लावून, ट्रायपॉडवर कॅमेरा लावून आकाशातील या हालचाली टिपल्याचे शादाब शेख यांनी सांगितले.अशी आहे आपली आकाशगंगाआकाशगंगा हे सूर्यमाला आणि पर्यायाने पृथ्वी ज्या दीर्घिकेमध्ये आहे, त्या दीर्घिकेचे नाव आहे. तिला इंग्रजीत मिल्की वे अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे म्हणतात. अगदी दाट अंधाऱ्या रात्री आकाशाकडे निरखून पाहिले तर असंख्य तारकांच्या गर्दीतून हा दुधाळ रंगाचा प्रवाह दिसतो. हा तेजस्वी प्रवाह म्हणजे आकाशगंगा. याच्या हालचाली टिपण्यात या छायाचित्रकारांना यश आले आहे.
चार वर्षांची तपस्या फळाला, कोल्हापूरच्या छायाचित्रकारांनी टिपली आकाशगंगा
By संदीप आडनाईक | Published: March 31, 2023 11:52 AM