कोल्हापूर : रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोटारसायकलवरून कर्कश आवाज करीत हुल्लडबाजी करणाऱ्या १५० पेक्षा जास्त तरुण-तरुणींवर पोलिसांनी मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. सुमारे ३० हजार रुपये दंड वसूल केला, अशी माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.
रंगपंचमीनिमित्त तरुण-तरुणी बेभान होऊन मंगळवारी सकाळपासून मोटारसायकलवरून धूम स्टाईलने शहरात फेरफटका मारीत होते. एकमेकांच्या अंगावर रंग मारीत जल्लोष करीत होते. काही तरुण-तरुणी ट्रिपल सीट मोटारसायकलवरून कर्कश हॉर्न मोठ्याने वाजवीत फिरताना पोलिसांनी त्यांना अडवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.
काहीजण मद्यप्राशन करून वाहन चालवितानाही आढळून आले. राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी पोलिसांनी आपापल्या हद्दींनुसार चौका-चौकांत नाकेबंदी करून ही कारवाई केली.
शहर वाहतूक शाखेनेही स्वतंत्रपणे वाहनचालकांवर कारवाई केली. दुपारी बारापासून ही कारवाई सुरू होती. पोलीस रस्त्यांवर पाहून काही तरुण-तरुणींनी आखलेले प्लॅन रद्द करीत कारवाईच्या भीतीने घरीच बसून राहणे पसंत केले.