कोल्हापूर : कोरोना कालावधीत पोलीस प्रशासनाचे अतुलनीय कार्य सुरू आहे. या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी येथील एम्पा (इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅनर्स) या संस्थेच्या वतीने स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यांची सजावट सुरू करण्यात आली आहे. बुधवारी सायंकाळी पोलीस मुख्यालय तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीची सजावट केली. त्यामुळे या इमारतींचा चेहरामोहराच बदलला.कोरोना कालावधीत पोलीस प्रशासनाच्या कार्याबाबत नागरिकांची आदरयुक्त भावना अभिनव पद्धतीने व्यक्त करण्यासाठी तसेच कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एम्पा या संस्थेने शहर व परिसरातील नऊ पोलीस ठाण्यांच्या इमारतीत सजावट करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही सजावट दोन दिवस राहणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस मुख्यालयाच्या इमारतीत भव्य-दिव्य अशी सजावट केल्याने पोलीस मुख्यालयाची इमारत अंतर्बाह्य झळकून निघाली. तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या इमारतीचीही सजावट करण्यात आली आहे. ही सजावट एम्पा संस्थेचे अध्यक्ष श्याम बासराणी, उपाध्यक्ष सुजित चव्हाण, इक्बाल बागवान, आदी संचालकांनी केली.