कोल्हापूर : भवानी मंडपापासून मोठ्या जल्लोषी मिरवणुकीने आलेली अंबाबाईची पालखी बुधवारी एका पोलीस अधिकाऱ्याने दसरा चौकातील मुख्य सोहळ्याला येण्यापासून रोखली. शाही दसऱ्याच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले, पण त्यामुळे दहा मिनिटे पालखी मुख्य सोहळा कमानीबाहेर ताटकळत उभी होती. अंबाबाईची पालखी येथूनच येते, याची माहिती बंदोबस्तावरील पोलिसांना नव्हती का, त्यांना कोणी याची कल्पना दिली नाही का? असा सवाल करत उपस्थितांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला.यंदाचा शाही दसरा मोठ्या जल्लोषात साजरा करत भवानी मंडपापासून अंबाबाईची पालखी भव्यदिव्य मिरवणुकीने पावणे सहाच्या दरम्यान दसरा चौकात आली. पण मुख्य कमानीत पोलिसांनी कडे केले व बॅरिकेट्स लावून पालखीच थांबवली. पालखी पुढील पुजारी व देवस्थानचे पदाधिकारी वारंवार त्या अधिकाऱ्याला समजावत होते, उपस्थित लोकदेखील पालखी येथूनच येते हे सांगत होते. पण ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते.शेवटी माजी नगरसेवक व पुजारी अजित ठाणेकर, ऐश्वर्या मुनीश्वर, मंदिराचे माजी व्यवस्थापक धनाजी जाधव यांची पोलिसांसोबत वादावादी झाली. वाद टोकाला पोहोचल्यावर विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आले व त्यांनी पालखी सोडायला सांगितली. त्यावेळीही पोलिसांनी ५० माणसांनाच प्रवेश दिला जाईल, आम्हाला तशाच सूचना आहेत, अशी भूमिका घेतली. त्यावर असे होणार नाही, पालखीसोबत सगळे मानकरी आत जातील, असे ठणकावून सांगितल्यावर अंबाबाईसह तुळजाभवानी, गुरू महाराजांची पालखी मुख्य सोहळ्याच्या ठिकाणी स्थानापन्न झाली.
कोल्हापूर: पोलीस अधिकाऱ्यानेच रोखली अंबाबाईची पालखी, पुजारी-पोलिसांमध्ये वादावादी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 4:58 PM