कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी प्रकरणातील प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी मंगळवारी रात्री पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झाले. जुना राजवाडा पोलिस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर अशा संयुक्त पथकाकडून शोध सुरू केला आहे. या पथकात सहा जणांचा समावेश आहे.कोरटकर याने २५ फेब्रुवारीला रात्री सावंत यांना मोबाइलवरून धमकी दिल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे पोलिस त्याला कोणत्याही क्षणी अटक करू शकणार आहेत. त्याच्या शोधासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पथके तैनात करण्याचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, जुना राजवाडा पोलिस आणि सायबर शाखेचे पोलिस अशा संयुक्त पथकाकडून त्याचा शोध सुरू केला आहे. ही पथके मंगळवारी रात्री नागपूरकडे रवाना झाली. नागपूर परिसरात काही ठिकाणी त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचा मोबाइल बंद असल्याने लोकेशन सापडत नाही. मात्र, त्याने आणखी कोणाशी संपर्क साधला आहे का, याचा तपास सायबर शाखेच्या मदतीने सुरू आहे. संयुक्त पथकात सहा जणांचा समावेश आहे. त्यांनी बुधवारी नागपूर परिसरात काही ठिकाणी त्याचा शोध घेतला आहे. मात्र, तो अद्याप सापडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रशांत कोरटकरच्या शोधासाठी पोलिसांचे पथक नागपूरला रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 12:35 IST