कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सत्तेत भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर आणि ताराराणी विकास आघाडीचे प्रकाश आवाडे एकत्र असले तरी इचलकरंजीचे राजकारण मात्र अधूनमधून डोके वर काढत असते.
राहुल आवाडे यांनी हाळवणकर समर्थक जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील यांच्या दाखल्याचा मुद्दा उपस्थित करीत प्रशासनाला जाब विचारला. यावेळी भाजपचे गटनेते अरुण इंगवले यांनी आवाडे यांना रोखल्याने दोघांमध्ये शाब्दिक चकमक रंगली.राहुल आवाडे हे सत्तेत असले तरी त्यांची कार्यपद्धती हे नेहमीच विरोधकाचीच राहिली आहे, याचे प्रत्यंतर शनिवारी (दि. ६) झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत आले.
विजया पाटील या आमदार सुरेश हाळवणकर यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्या दुसऱ्यांदा भाजपकडून कबनूर मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यावेळी त्यांनी ‘इतर मागास’चा दाखला जोडून निवडणूक लढविली व त्या निवडूनही आल्या.
यानंतर कांता बडवे, मिलिंद कोले यांनी पाटील यांच्या दाखल्याबाबत तक्रार दिली होती. जातपडताळणी समितीने छाननीत पाटील यांचा दाखल अवैध ठरविला होता. यावर पाटील यांनी अपील केल्याने हा विषय सध्या उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.‘पाटील अपात्र असताना त्यांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत का बसू दिले?’ असा सवाल या ‘स्थायी’च्या सभेत राहुल आवाडे यांनी उपस्थित केला. पाटील यांनी सहभागी होऊन कबनूर येथील पेयजल योजनेबाबत ठरावही मांडला.आवाडे यांना हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा अधिकार जिल्हा परिषदेचा नसून तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आल्यानंतर मग त्यावर कार्यवाही केली जात असल्याचे आवाडे यांना सांगण्यात आले; परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. यावरूनच अरुण इंगवले आणि त्यांच्यामध्ये वाद झाला.सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भालेराव यांनी आवाडे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून जेव्हा याबाबत आदेश येईल त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे सांगून हा विषय संपविला.
आवाडे शिवसेनेच्या भूमिकेतसध्या राज्यात शिवसेना सत्तेत असली तरीदेखील ती विरोधकांप्रमाणे वागत आहे. हीच भूमिका जिल्हा परिषदेत राहुल आवाडे वठवत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. तशी प्रतिक्रिया व्यक्त करून वैयक्तिक राजकारणासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभागृहाचा वापर होऊ नये, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली.