कोल्हापूर : अतिशय संवेदनशील विषय बनलेल्या कोल्हापूरच्या नवीन शिवाजी पुलाच्या कामकाजासाठी आवश्यक सर्व परवानग्या सोमवारी (दि. ४) होणाऱ्या दिल्लीतील बैठकीमध्ये मिळतील. त्यासाठीचे सकारात्मक वातावरण तयार करण्यामध्ये यश आले असून मुळातच ब्रह्मपुरी संरक्षित स्थळापासून १०० मीटरपेक्षा पुलाचे अंतर अधिक असल्याने पुलाच्या कामातील अडथळा दूर होईल, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे.
दरम्यान, या पुलाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई येथे अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्याशीही याबाबत चर्चा केली. संभाजीराजे यांनी शिवाजी पुलासंदर्भात राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणच्या अध्यक्षा सुष्मिता पांडे यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन त्यांना याबाबतचे सविस्तर निवेदनही दिले. त्यांनी याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.प्राचीन वास्तू व पुरातत्त्वीय कायद्यानुसार ऐतिहासिक वास्तू व स्थळापासून १०० मीटर अंतरापर्यंत बांधकाम करता येत नाही, या तरतुदीकडे बोट दाखवून या पुलाच्या कामावर निर्बंध घालण्यात आले होते. परिणामी नव्या पुलाचे काम ठप्प पडले आहे.
ही माहिती पंतप्रधानांना दिल्यानंतर याबाबतचे दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. मात्र, ते राज्यसभेत मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे आपण भारतीय पुरातत्त्व विभागाच्या महानिदेशिका उषा शर्मा व सुष्मिता पांडे यांना भेटून यातून मार्ग काढण्याची विनंती केली होती, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, शुक्रवारी सकाळी अॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांच्या दालनामध्ये शिवाजी पुलाबाबत दीड तास बैठक झाली. या बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते, कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी पुलाची गरज, वाहतुकीचा ताण, पुरातत्त्वचा कायदा आणि जनतेची होणारी गैरसोय याची सविस्तर माहिती दिली.
कीकडे शासनाच्या विधि व न्याय विभागाने पुरातत्त्वच्या परवानगीशिवाय पुलाचे काम सुरू करता येणार नसल्याचा अभिप्राय दिल्याने आपत्कालीन तरतुदींचा आधार घेऊन हे काम सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अॅड. कुंभकोणी यांनी विविध प्रश्नांच्या आधारे माहिती घेतली. दिल्ली येथे सोमवारी (दि. ४) होणाऱ्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, त्यावर पुढची दिशा ठरवण्याचा यावेळी निर्णय झाला. राज्याच्या आपत्कालीन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई यावेळी उपस्थित होते.
मोजणीमध्ये पूल १०० मीटरच्या पुढेसंभाजीराजे यांनी विनंती केल्यानंतर पर्यायांचा अभ्यास सुरू केला असता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि महसूल विभागाचे सन १९५६ पासून संयुक्त सर्वेक्षण झाले नसल्याचे पुढे आले. त्यानंतर चारच दिवसांपूर्वी या दोन्ही विभागांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये पूलच ब्रह्मपुरी टेकडीपासून १२७ मीटर अंतरावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सर्वच अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले असून यामुळे आता शिवाजी पुलाच्या कामाचा अडथळा दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीकेवळ एका कायद्यामुळे तीन वर्षे पुलाचे केवळ उर्वरित २० टक्के काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे जनता, प्रशासन आणि शासन वेठीस धरले गेले. केवळ पुलाची दिशा बदलली असती तरीही यातून मार्ग निघाला असता. मात्र, त्यावेळच्या अधिकाऱ्यांनी अभ्यास न करता हे डिझाईन केल्यामुळे हा विलंब झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे.