कोल्हापूर : बसस्टॉप, बझार, आदी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांच्या खिशातील मोबाईल हातोहात लंपास करणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १0 मोबाईल हस्तगत केले असून, त्यांचा म्होरक्या अजून मिळून आलेला नाही. त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.शहरात गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे मोबाईल, महिलांच्या पैशाच्या, दागिन्यांच्या पर्स लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत. बसस्थानक, महाद्वार रोड, अंबाबाई मंदिर, आठवडा बझार, आदी ठिकाणी गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सपाटाच लावला होता. या वाढत्या चोरीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
जुना राजवाडा पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघा अट्टल चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून चौकशी केली असता, १0 मोबाईल मिळून आले. त्यांच्या म्होरक्याला, साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चाहूल लागताच, तो पसार झाला आहे.
या तिघांची टोळी असून, त्यांनी शहरासह इचलकरंजी, सांगली जिल्ह्यात चोरी केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे येत आहे. येत्या दोन दिवसांत संपूर्ण तपासाचे चित्र स्पष्ट होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.