कोल्हापूर : ‘गोकुळ’मधील सत्ताधारी गटाने बुधवारी (दि. २४) सहायक दुग्ध निबंधकांकडे सादर केलेल्या यादीत १0२६ संस्थांचे ठराव आहेत; मग यापूर्वी २७५0 ठराव आहेत असे म्हणणाऱ्यांचे १७२४ ठराव गेले कुठे? असा सवाल गोकुळ बचाव समितीने केला आहे. १0२६ ठरावदेखील सुपरवायझरनी दमदाटी करून गोळा केलेले ठराव आहेत, असा आरोप करून आपल्याकडे १८३६ ठरावधारक असल्याचा आणि आपले म्हणणे जिल्हा दुग्ध निबंधक व पुणे विभागीय उपनिबंधकांकडे लेखी दिले असल्याचा दावा गोकुळ बचाव समितीने केला आहे.गोकुळ मल्टिस्टेट ठरावाला पाठिंबा म्हणून बुधवारी सत्ताधारी गटातील करवीरसह जिल्ह्यातील १0२६ संस्थांनी सहायक दुग्ध निबंधक गजेंद्र देशमुख यांच्याकडे लेखी निवेदन दिले होते. त्यात विरोधकांच्या दबावाला बळी न पडता सभेचा अहवाल पाठवावा, अशी मागणी करण्यात आली होती. याला प्रत्युत्तर म्हणून गुरुवारी गोकुळ बचाव समितीतर्फे किरणसिंह पाटील, बाबासो देवकर, बाबासाहेब चौगुले, किशोर पाटील यांनी प्रसिद्धीपत्रक काढून त्यास प्रत्युत्तर दिले.
मल्टिस्टेटला थेट सभासदांतूनच विरोध होत असल्यानेच सत्ताधारी मंडळींकडून आमदार सतेज पाटील यांच्यावर आरोप होत असून, याचा समिती जाहीर निषेध करत असल्याचे म्हटले आहे. सभाच बेकायदेशीर झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
सभासदांचा विरोध वाढत असल्याने आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर सत्ताधारी बेताल वक्तव्ये करत आहेत. ‘गोकुळ’ ही जिल्ह्याची मातृसंस्था असल्याने परिपूर्ण व खरा अहवाल जिल्हा सहनिबंधकांनी पुणे उपनिबंधकांकडे सादर करावा, असा आग्रह धरला होता; पण याला विरोधक दबाव म्हणत, विरोधकांवर टीका करत आहेत.
बदनामी तुमच्यामुळेच..!खरा अहवाल पाठवा, असा आग्रह धरल्यावर गोकुळची बदनामी होत असल्याचे सत्ताधारी मंडळी म्हणतात; पण गोकुळची खरी बदनामी संचालक मंडळाचा अवास्तव खर्च आणि स्कार्पिओ घेऊन फिरण्याचेच होत आहे, याकडे बचाव समितीने लक्ष वेधले आहे.