सचिन भोसलेकोल्हापूर : परदेशातील थंड वातावरणात तत्काळ समरस होऊन दर्जेदार कामगिरी देशासाठी पदक जिंकण्याची कामगिरी व्हावी, यासाठी चक्क आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्मा माने हिच्या (वडणगे, जि. कोल्हापूर) येथील घराशेजारीच त्या पद्धतीची वातानुकूलित तालीम बांधण्यात आली आहे. यासह क्युबाचा आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकाविणारा कुस्तीगीर याँड्रो क्युनटाना हाही याच तालमीत तिला प्रशिक्षण देणार आहे.परदेशातील उणे अंश सेल्सिअस तापमानात भारतातील कुस्तीगीरांना आपली कामगिरी उंचावता येत नाही; त्यामुळे त्या पद्धतीची वातावरण निर्मिती करून सराव केल्यानंतर आपल्या कामगिरीत सुधारणा होते, ही बाब आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर रेश्माला उमगली. त्यामुळे तिने वडील अनिल यांच्याकडे आपल्या घराशेजारीच तालीम बांधण्याचा हट्ट धरला. कशीबशी तालीम बांधून झाली. मात्र, त्यात आर्थिक गणिताअभावी आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे साहित्य घेणे काही माने कुटुंबीयांना शक्य झाले नाही.
ही बाब पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना समजली. त्यांनी स्वत:हून लक्ष घालीत वडणगे-निगवे रस्त्यावरील माने कुटुंबीयांच्या ‘छत्रपती शाहू महाराज तालमी’चा कायापालट करीत यात सुमारे कोट्यवधीचे साहित्यही दिले. तत्पूर्वी रेश्माला असा सराव करण्यासाठी एक तर लखनौ येथील भारतीय खेल प्राधिकरणच्या तालमीत किंवा दिल्ली येथील सोनपत-बालगड येथे जावे लागत होते. त्यात श्रम, पैसा व वेळ जात होता. त्यातून दमछाक होऊ लागल्याने सरावासह स्पर्धेतील कामगिरीवर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे रेश्माने घराशेजारीच अशी तालीम बांधण्याचे स्वप्न बघितले होते. ते स्वप्न न राहता प्रत्यक्षात उतरले असून, त्यात ती आपली धाकटी बहीण नम्रता व भाऊ कुस्तीगीर सचिन, युवराज यांच्याबरोबर सराव करीत आहे.
तिला आॅलिम्पिकमध्ये पात्र ठरून तिला देशासाठी सुवर्ण मिळवायचे आहे. हेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालकमंत्री पाटील व शाहू छत्रपती यांच्या सहकार्याने तिच्या वडणगे येथील तालमीत क्युबाचा आॅलिम्पियन सुवर्णपदक विजेता यांड्रो क्युनटाना हा काही महिने कोल्हापुरात राहून तिला मार्गदर्शन करणार आहे. यांड्रोशी बोलणी झाली असून तसा करारही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती केंद्रासह प्रशिक्षकाचेही मार्गदर्शन घराशेजारीच मिळणार आहे.
या तालमीत मध्यवर्ती वातानुकूलित यंत्रासह जंपिंग बॉक्स, सीझ बॉल, हर्डल्स, लॅडर्न, हात आणि पाय मजबूत व्हावेत, यासाठी दहा लाखांहून अधिक किमतीची सायकल, रोइंंग मशीन, डमी, ४० बाय ४० ची आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट, जिम अशा सुमारे कोट्यवधी रुपयांच्या साहित्याचा समावेश आहे.
परदेशातील उणे अंश सेल्सियस वातावरणात कामगिरी उंचावण्यासाठी कष्ट जादा घ्यावे लागत होते. त्याचा परिणाम कामगिरीवर होत होता. आपल्यालाही कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा मिळावी, ही इच्छा पालकमंत्र्यांकडे व्यक्त केली. पालकमंत्री पाटील यांनी त्याला मूर्तिमंत स्वरूप दिले. त्याचा लाभ मला २०२० च्या आॅलिम्पिकसाठी होणार आहे. यापुढील कामगिरी निश्चितच उंचावणारी असेल.- रेश्मा माने, आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर