कोल्हापूर : प्रज्ञान कला अकादमीतर्फे वारणानगर येथे चौथा विलासराव कोरे लघुपट महोत्सव गुरुवारी (दि. ५) संध्याकाळी ६ ते रात्री ९ दरम्यान शास्त्री भवन येथे होणार असून त्यात यंदाचा वीर शिवा काशीद अभिनय पुरस्कार राजकुमार तांगडे यांना माजी मंत्री विनय कोरे (सावकर)यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी नाटककार दिलीप जगताप, चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया आणि अभिनेते गजेंद्र तांगडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्र अंनिस व आटपाटची दुसरी विवेक लघुपट स्पर्धा गतवर्षी ‘जात वास्तव’ या विषयावर आयोजित केली होती. यातील निवडक विवेकी लघुपट प्रज्ञानच्या या लघुपट महोत्सवासाठी निवडलेले आहेत. यावेळी डॉ. कोठडिया स्क्रीनिंगदरम्यान उपस्थित लघुपटकर्त्याशी संवाद साधणार आहेत. मुंबईनंतर हे विवेकी लघुपट प्रथमच वारणानगर येथे दाखविण्यात येत आहेत.
या महोत्सवात ‘उतरंड’ (दि. आनंद शिंदे / वाळू कलाकार मच्छिंद्र शिंदे / मुंबई), ‘स्वीकार’ (दि. मल्हार जोशी, सह दि. श्रीराम मोहिते, कथा - अमोल कांबळे, संकलन - मुजिब अत्तार /कोल्हापूर), ‘कलर्स आॅफ इंडिया’ (दि. योगेश पाटील/ जळगाव), ‘लिगसी आॅफ पेन’(दि. सूरजकुमार उषाबाई सुधाकर व भूषण खोडके/ औरंगाबाद ), ‘फेस टू फेस’ (दि. योगेश मेहेंगे/ अमरावती), ‘पुतळा’' (दि. गणेश धोत्रे/ सातारा), ‘एनलायटन’ (ओमेय साठे/ सातारा), ‘क्षमस्व’ (दि.अमित पवार/ मुंबई ), ‘द क्वेश्चन’(दि. आकाश बोकमुरकर/ कोल्हापूर ), ‘इसी बात का डर है’ (दि. शिरीष पवार/ अभिनेता- राजकुमार तांगडे*/ मुंबई) हे लघुपट दाखविण्यात येणार आहेत,अशी माहिती ‘प्रज्ञान’चे रमेश हराळे व नीलेश आवटी यांनी दिली आहे.शेती करता करता नाटक व चित्रपट अशा दोन्ही माध्यमांतून अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या राजकुमार तांगडे (मु.पो. जांबसमर्थ, जि. जालना) यांना वीर शिवा काशीद यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘दलपतसिंग येती गावा’, ‘आकडा’ अशी नाटके तसेच ‘देऊळ’, ‘नागरिक’, ‘म्हादू’ , ‘तुकाराम’,‘जाऊंद्या ना बाळासाहेब’ व कान्समध्ये पोहोचलेल्या ‘क्षितिज’मध्ये त्यांनी अभिनय केला आहे. पु. ल. देशपांडे महाकरंडक स्पर्धेत आणि ‘सिनेमा’ या लघुपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ असे पुरस्कार मिळाले आहेत.