कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी रुकडीच्या प्रमोदिनी जाधव यांचे नाव आज अचानक स्पर्धेत आले. माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी त्यांच्यासाठी आग्रह धरला आहे. उपाध्यक्षपदासाठी सतेज पाटील गटाकडून शशिकांत खोत यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी उद्या, शनिवारी दुपारी चार वाजता काँग्रेस कमिटीत काँग्रेस सदस्यांची बैठक होत आहे. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे सदस्यांची मते अजमावून घेणार आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवड रविवारी (दि. २१) होत आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी खुले आहे. या गटातून निवडून आलेल्या भाग्यश्री गायकवाड, ज्योती पाटील या दावेदार आहेत; पण गायकवाड या गेले अडीच वर्षे महिला व बालकल्याण सभापती आहेत. त्यांना पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील व पी. एन. पाटील यांच्या समर्थकांमध्ये एकही महिला सदस्य सर्वसाधारण गटातून निवडून आलेली नाही. सतेज पाटील यांच्या गटाच्या प्रिया वरेकर व पी. एन. पाटील समर्थक विमल पाटील याही ‘ओबीसी’ राखीव गटातून निवडून आलेल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पी. एन. पाटील अध्यक्षपदासाठी आग्रही आहेत. वरेकर व पाटील दोन्ही सदस्या त्यांच्या करवीर मतदारसंघातील असल्या तरी पाटील यांचे नाव पुढे आहे. मावळत्या सभागृहात पी. एन. पाटील गटाकडे उपाध्यक्षपद व समाजकल्याण सभापती ही महत्त्वाची पदे आहेत. त्यामुळे यावेळेला अध्यक्षपद हातकणंगले तालुक्यास दिले जावे, असा प्रवाह आहे. त्यातूनच जाधव यांचे नाव पुढे आले आहे. उपाध्यक्ष पदासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील आग्रही असून, या पदासाठी शशिकांत खोत यांचे नाव निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व दिसत असले तरी गेल्या चार महिन्यांपासून राजकीय संदर्भ बदलत गेले आहेत. प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे, प्रकाश आबीटकर शिवसेनेत गेले आहेत. या सदस्यांना काँग्रेस विरोधात जाता येणार नसले तरी निवडणुकीच्या तोंडावर अडचणीही तितक्याच आहेत. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी करायच्या आणि आहे तसेच सभापती कायम ठेवण्याचा विचार होऊ शकतो.
कोल्हापूर : प्रमोदिनी जाधव चर्चेत
By admin | Published: September 20, 2014 12:05 AM