कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत संघाचे माजी अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील, माजी आमदार सुहास तिडके व मजूर फेडरेशनचे अध्यक्ष संजय कुसाळकर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय ‘परिवर्तन पॅनेल’ने बाजी मारली. विरोधी भाजपपुरस्कृत ‘सहकार पॅनेल’चा धुव्वा उडवत २१ पैकी २० जागा जिंकत संघाची सूत्रे आपल्या ताब्यात ठेवली. भाजपच्या पॅनेलचे नेतृत्व आमदार प्रविण दरेकर व आमदार प्रसाद लाड यांनी केले.कोल्हापुरातून मुकुंद पोवार यांना संधी मिळाली.संघाच्या २१ जागांपैकी सात जागा बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित १४ जागांसाठी रविवारी (दि. ४) राज्यातील तेरा केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. एकूण २३५७ पैकी १८६७ (७९ टक्के) मतदान झाले. संघाच्या पुणे येथील कार्यालयात मंगळवारी मतमोजणी करण्यात आली.
त्यामध्ये डॉ. प्रताप पाटील, सुहास तिडके व संजय कुसाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘परिवर्तन पॅनेल’ने १४ पैकी १३ जागा सरासरी ५८० मताधिक्क्याच्या फरकाने जिंकत संघावर वर्चस्व प्रस्थापित केले.
विरोधी ‘सहकार पॅनेल’चे सुभाष आकरे (अहमदनगर) हे एकमेव संचालक म्हणून निवडून आले. मागील संचालक मंडळात कोल्हापूर जिल्ह्यातील अॅड. अशोकराव साळोखे व विजय पोळ प्रतिनिधीत्व करत होते. आता मुकुंद पोवार यांना संधी मिळाली आहे.
मुंबईचे वर्चस्व कमीसंघाच्या मागील निवडणुकीत मुंबई विभागाचे वर्चस्व राहिले. त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती/जमाती गटातून रामदास मोरे हे एकमेव विजयी झाले; तर कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील पाच संचालकांना संधी मिळाली. पूर्वीच्या ५२ लोकांच्या संचालक मंडळात पाचजण होते पण आता २१ जणांमध्ये पाच जणांना संधी मिळाली हे विशेष आहे.
बिनविरोध संचालक असे -हिरामल सातकर (पुणे), डॉ. प्रताप पाटील (कोल्हापूर), गुलाब मगर (औरंगाबाद), अॅड. सुहास तिडके (विदर्भ), महादेवराव सोनवणे (राज्यस्तरीय संस्था), बी. डी. पारले (मुबंई), रामकृष्ण बांगर (बीड).
निवडून आलेले संचालक असे-भाऊसाहेब कुराडे (कोकण), पांडुरंग सोले-पाटील (नाशिक), एन. एम. हुल्लाळकर (विभागीय स्तरीय संस्था), सुभाष आकरे (अहमदनगर).सर्वसाधारण गट - संजय कुसाळकर (पुणे), चंद्रकांत जाधव (सातारा), सुनील ताटे (सांगली), मुकुंद पोवार (कोल्हापूर), विलास महाजन (यवतमाळ).राखीव गट - अनुसूचित जाती/जमाती- सिद्धार्थ पठाडे (चंद्रपूर), भटक्या विमुक्त जाती/जमाती- रामदास मोरे (मुंबई), इतर मागासप्रवर्ग- अर्जुनराव बोरुडे (अहमदनगर), महिला प्रतिनिधी- विद्याताई पाटील (लातूर), सुनीता माळी (धुळे).
सहकारातील शिखरसंस्थेच्या सभासदांनी जो विश्वास आमच्यावर टाकला आहे, त्यास पात्र राहून यापुढे आदर्शवत कारभार करून दाखवू. सहकार रोज बदलत असून त्यानुसार संस्थांना प्रशिक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहे.- डॉ. प्रताप पाटील,प्रमुख, परिवर्तन पॅनेल