कोल्हापूर : शहरातील विविध विकासकामे करण्याकरिता जास्तीत जास्त निधी आणायचा असेल तर वेगवेगळे प्रस्ताव तयार करून शासनाच्या संबंधित विभागाकडे प्रस्ताव तयार करून पाठवा, अशा सूचना करतानाच त्यासाठी निधी मंजूर करून आणण्याचे प्रयत्न आपण स्वत: जातीनिशी प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी महानगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केली.नगरोत्थान, अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामे तातडीने पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यातील २०० कोटींच्या निधीकरिता प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करा आणि तातडीने तो शासनाकडे पाठवा, विकास आराखड्यात जे जे रस्ते सध्या महापालिकेच्या ताब्यात आहेत, त्या-त्या रस्त्यांवर तातडीने फलक लावा, या रस्त्यांच्या खर्चाचे प्रस्ताव तयार करा. त्यासाठी निधी आणण्याची जबाबदारी आपली असेल, असेही महाडिक यांनी सांगितले.सुमारे दोन तास चाललेल्या बैठकीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. सध्या सुरू असलेली कामे, नवीन सुचविलेली कामे, त्यामध्ये असणाऱ्या अडचणी आणि नवीन करायची कामे यांवर बैठकीत चर्चा झाली. अग्निशमन दलाची तीन नवीन केंदे्र सुरू करण्याकरिता प्रकल्प तयार करा.
बांधकाम खर्च, नवीन उपकरणे, वाहने यांचा समावेश करावा. अन्य स्थानके बळकटीकरणासाठीही निधी मागा; आपण त्याकरिता प्रयत्न करतो, असे महाडिक म्हणाले. पूरहानी या सबबीखाली शहरातील पूल दुरुस्तीकरिता चार कोटी रुपये मागण्याचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे द्या, असेही त्यांनी सांगितले.उपनगरांत भाजी मंडई, उद्यान, वाचनालये, क्रीडांगण अशा कारणांसाठी आरक्षित असलेल्या जागांची यादी माझ्याकडे द्या. या जागा विकसित करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. उपनगरांतील समस्या जाणून घेण्याकरिता आमदार महाडिक, आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन फिरती करण्याचेही बैठकीत ठरले.
अधिकारी नाहीत म्हणून थांबू नकामनपाकडे अधिकारी वर्ग कमी असल्याची तक्रार आहे. परंतु अधिकारी कमी आहेत म्हणून थांबू नका. तुम्हाला विकास कामांबाबत जे जे प्रस्ताव तयार करायचे आहेत ते सर्व खासगी संस्थांकडून तयार करुन घ्या. त्याचे शुल्क आम्ही द्यायला तयार आहोत. येत्या महिन्याभरात तीन ते चार प्रमुख अधिकारी महापालिकेकडे सेवेत रुजू होतील. त्याकरीता आपले प्रयत्न सुरु आहेत, असे महाडिक यांनी सांगितले.
बैठकीत आयुक्त अभिजित चौधरी, स्थायी सभापती आशिष ढवळे, विरोधी पक्षनेते विलास वास्कर, भाजप गटनेते विजय सूर्यवंशी, ताराराणी आघाडी गटनेते सत्यजित कदम यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
आमदार महाडिक यांनी केलेल्या सुचना -
- * सावित्रीबाई फुले, पंचगंगा रुग्णालयातील कामांचे प्रस्ताव तयार करा.
- * पंचगंगा विस्तारीकणासह अन्य ठिकाणच्या स्मशानभुमी विकासीत करा.
- * पाणी गळतीच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करुन तातडीने गळती दूर करा.
- * पर्यायी नाट्यगृहाकरीता दोन ते तीन जागा निश्चित प्रस्तावासह सुचवा.
- * खेलो इंडिया योजनेअंतर्गत शिवाजी स्टेडियम, गांधी मैदानाचा प्रस्ताव तयार करा.
- * मनपाच्या पाच शाळा दत्तक घेऊन विकास करण्याकरीता माझ्याकडे द्या.