कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पावणेदोन लाख विद्यार्थ्यांचा निकालामध्ये समावेश होता. महापालिकेच्या शाळांचा निकाल मात्र शनिवारी (दि. १२) जाहीर करण्यात येणार आहे.माध्यमिक शाळांचे निकाल अगोदर लागतात. या वर्षी १ मे रोजी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व खासगी शाळांचे निकाल जाहीर करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळांच्या निकालाची उत्सुकता होती. साधारणत: १५ एप्रिलनंतर परीक्षा संपल्या की मुले शाळेत येतच नाहीत; पण शिक्षकांची पेपर तपासणी व निकालाची धांदल सुरू असते.
आपल्याकडे निकाल हातात आल्याशिवाय खऱ्या अर्थाने सुटीची सुरुवात होत नाही. निकाल काय लागेल, याची धाकधुक मनात ठेवून कोणी सुटीचा आनंद साजरा करीत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या नजरा निकालाकडे लागलेल्या असतात. निकाल हातात घ्यायचा आणि मामा, आत्या, मावशीच्या गावाला सुटीसाठी जायचे, असे प्रत्येक विद्यार्थ्याचे नियोजन असते.माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनंतर, शनिवारी सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत जिल्हा परिषदेच्या शाळांनी निकालपत्रांचे वाटप केले. जिल्हा परिषदेच्या १९९४ शाळा असून त्यामध्ये सुमारे पावणेदोन लाख विद्यार्थी आहेत.
परीक्षा संपल्यापासून गेले पंधरा-वीस दिवस निकालाच्या प्रतीक्षेने विद्यार्थ्यांचा जीव अक्षरश: टांगणीला लागलेला होता. सकाळी उठल्यानंतर पंधरा दिवस अडगळीत टाकलेला गणवेश घालून, आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन विद्यार्थी शाळेत गेले. निकालपत्र घेतल्यानंतर मित्रामित्रांमध्ये श्रेणी किती मिळाली याच्या गप्पा मारीतच विद्यार्थी घराकडे जाताना दिसत होते.महापालिका शाळांची उन्हाळी सुटी वाढविल्याने त्यांच्या निकालाला विलंब झाला आहे. या शाळा शनिवारी निकाल जाहीर करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळा १५ जून रोजी सुरू होणार आहेत.
पालकांची तारांबळकाही विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर सुटीसाठी परगावी गेले. त्यांच्या पालकांनी निकालपत्र घेतले. सकाळी नेहमीची कामे थांबवून शाळेत जाऊन निकाल घेताना पालकांची तारांबळ उडाल्याची दिसली.