समीर देशपांडे कोल्हापूर पत्रकार आणि नेतेमंडळी यांचा रोजचा संपर्क. त्यामुळे पत्रकार परिषद घेणे नेत्यांच्या दृष्टीने आणि परिषदेला जाणे हा पत्रकारांच्या दृष्टीने अपरिहार्य असा भाग. कोल्हापूरच्या प्रमुख काही नेत्यांच्या पत्रकार परिषदा आणि तिथले वातावरण यावर आज शुक्रवारी होणाऱ्या पत्रकार दिनानिमित्त एक दृष्टिक्षेप...दीपक केसरकर, पालकमंत्रीयांना परिषद घेण्यासाठी कोणतंही स्थळ चालतं. मात्र कितीही गडबड असली तरी प्रश्नाला जरी अपेक्षित नसलं तरी अतिसविस्तर उत्तर देण्याची यांची सवय. त्यामुळे ते उभ्याने बोलत असले तर हातात बूम धरणाऱ्या पत्रकारांना रात्री मलमच लावण्याची वेळ येते. शांतपणे बोलणार. मध्येच नाकावरच्या चष्म्याच्या वरच्या बाजूने पाहणार. कोणताही प्रश्न टाळणार नाहीत, पण अडचणीतील प्रश्नाला असं काही उत्तर देणार की मूळ प्रश्नच बाजूला पडल्यासारखं वाटावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना प्रवक्ता का केलं आहे हे त्यांच्या या गुणवैशिष्ट्यांमुळे लक्षात येतं.
चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीसंभाजीनगर निवासस्थान, चिकोडे ग्रंथालय ही ठरवून पत्रपरिषदेची ठिकाणं. राहुल चिकोडे यांनी स्वागत केलं की मग दादा नेमकी मांडणी करणार. प्रश्न कसे येतील त्यावर यांची उत्तरं. भावनेच्या भरात बोलण्याची त्यांची एक पध्दत आहे. हेतू तसा नसला तरी काही वेळा मग असे शब्द वापरले जातात की, त्यावर खुलासा करावा लागतो. पण किचकट विषय समजून सांगण्याची त्यांची पध्दत छान. पत्रकारांनी विचारलं, की दक्षिणमधून अमल की शौमिका महाडिक… तुम्हांला तिकीट हवंय का.. बी फाॅर्म माझ्याकडेच आहे, अशी विचारणा करत ते विषयच संपवून टाकतात.
राजेश क्षीरसागर - कार्याध्यक्ष, नियोजन मंडळयांच्या पत्रकार बैठका शक्यतो त्यांच्या ‘शिवालय’ निवासस्थानीच होतात. टकटकीत पेहराव. त्यात शक्यतो भगवं जाकीट. आजूबाजूला पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची खच्चून गर्दी. आपलं म्हणणं ठासून सांगतानाच आरोप करतानाही खणखणीतपणे करण्याची भूमिका. जिथे अडचण वाटेल तिथे माहिती घेऊन सांगतो, अशी सौम्य भूमिका. वरिष्ठ नेतृत्वाची बाजू घेताना कोणालाही अंगावर घेण्याची तयारी.
हसन मुश्रीफ, माजी मंत्रीशक्यतो सर्किट हाऊस आणि अगदी गरज पडली तर केडीसीत यांची पत्रकार परिषद. एका बाजूला युवराज पाटील, दुसऱ्या बाजूला भैय्या माने, मागे एका बाजूला फ्रेममध्ये दिसणार नाहीत असे मुन्ना आणि इम्रान अशी बैठक व्यवस्था. एक पाय हलवत मुश्रीफ यांची परिषद सुरू होते. त्यांना द्यायचा तो मेसेज देऊन झाला की विचारेल त्या प्रश्नाला दिलखुलासपणे उत्तर देण्याची यांची पध्दत. पूर्वी ते हेडिंग कसं द्यायचं, रिव्हर्स मध्ये टाका, चौकट करा, अशाही पत्रकारांना सूचना द्यायचे. जादा माहिती हवी असेल तर मग शिवाजी पाठवलं तुम्हांला असं सांगून तोंडभर हसताना त्यांचं सगळं अंगही गदगद हलतंय. हात जोडून नमस्कार करून निरोप देण्याची पध्दत.
सतेज पाटील, माजी मंत्रीअजिंक्यतारा हे यांचं हक्काचं पत्रकार परिषदेचं ठिकाण. हल्ली बऱ्याच वेळा नरके सर बाजूला उभे असतात. समोर श्रीकांत, अशोक धावपळीत. आरोप असतील तर गरजेच्या कागदांच्या झेराॅक्स देणार. जे बोलायचं ते ठरवून, ठासून बोलणार. मुख्य मुद्दा झाला आणि राजकीय प्रश्न विचारला की ते आज नको, माझी मूळ बातमी आत जातेय आणि नंतर बोललेलं मोठं होतंय असं म्हणणार. मग चहा-नाश्ता घेताना हे ऑफ दि रेकाॅर्ड हां… असं म्हणत मग अनेक पडद्यामागच्या गोष्टी सांगणार. पण तेही सावधपणे…परिषद झाल्यानंतर आलेल्या पत्रकारांना फोन करून कशी झाली पत्रकार परिषद याचाही आवर्जून फिडबॅक घेणार.महादेवराव महाडिक, माजी आमदारयांच्याकडे भेटायला जातानाही शक्यतो पत्रकार मिळून जातात. यांचंही बोलणं अघळपघळ. आताशा तेही कमी बोलतात. वयाचाही परिणाम आहे. परंतु गोकुळ किंवा राजाराम कारखान्यावरील त्यांच्या पत्रकार परिषदा म्हणजे वन मॅन शो. या..या…. काय म्हणतोय तुमचा तो दोस्त. एखाद्या पत्रकारालाच ते एखाद्या नेत्याबद्दल विचारतात. अहो, आप्पा.. ते असा आरोप करत होते …मग करू दे की. दुसरं काय केलंय त्यांनी. या म्हाडकाला कोल्हापूरच्या जनतेनं मोठं केलंय. यांची पत्रकार परिषद म्हणजे जाहीर भाषणच असते.