कोल्हापूर : कडधान्य बाजार एकदम शांत झाल्याने मालाचा उठावच होत नाही. परिणामी तूरडाळ, हरभरा डाळीच्या दरात घसरण सुरू झाली असून, घाऊक बाजारात प्रतिकिलो ५७ रुपयांपर्यंत दर आला आहे. भाजीपाल्याची आवक मंदावल्याने दर थोडे वधारले आहेत. स्ट्रॉबेरी, पपई, डाळींब या फळांनी मार्केट फुलले असून बोरे, संत्र्यांची आवक कायम राहिली आहे.गेल्या वर्षी डाळींचे उत्पादन चांगले झाले होते. परिणामी सरकारला तूर खरेदी करावी लागली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात ८० रुपयांपर्यंत तूरडाळ व हरभरा डाळ स्थिर होती. मात्र आठवड्याभरापासून डाळींची मागणी कमालीची घटली आहे.
मालाचा उठावच होत नसल्याने दरात घसरण सुरू झाली आहे. सध्या किरकोळ बाजारात ६५ ते ७० रुपयांपर्यंत डाळ असली तरी घाऊक बाजारात मात्र ५७ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर खाली आला आहे. साखरेचे दरही कमी होत आहेत.
किरकोळमध्ये ३४ रुपये दर असून, त्यात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. शाबूचा दर किलोमागे दहा रुपयांनी कमी झाला आहे. सरकी तेलाचा दर प्रतिकिलो ८० रुपयांंवर स्थिर आहे. खोबरे १८० रुपये, तर ज्वारीचा दर २५ ते ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत राहिला आहे.कोबी, वांगी, ढबू, कारली, दोडका या प्रमुख भाज्यांची आवक काहीशी मंदावली आहे. त्याचा परिणाम दरावर दिसत असून किलोमागे सरासरी चार ते पाच रुपयांनी भाजीचे दर चढे राहिले आहेत. एरव्ही घाऊक बाजारात दोन ते सहा रुपयांपर्यंत किलो असणारा लालभडक टोमॅटो मात्र थोडा वधारला आहे.
घाऊक बाजारात त्याचा दर प्रतिकिलो ५ ते १६ रुपयांपर्यंत आहे. कोथिंबिरीची आवक कायम असून सरासरी पंधरा रुपये पेंढी आहे. मेथी, पालक, पोकळा, शेपू पेंढी १० रुपये आहे. कांदा, बटाट्याची आवक स्थिर असल्याने दर कायम राहिले आहेत. घाऊक बाजारात ४ ते १३ रुपये, तर बटाट्याचा ४ ते १८ रुपये दर राहिला आहे.फळबाजार स्ट्रॉबेरी, पपई, डाळिंबांनी फुलला आहे. संत्री, सफरचंद, बोरांची आवक चांगली आहे. पेरू, कलिंगडांचीही आवक बऱ्यापैकी असून मागणीही चांगली आहे.
पशुखाद्य महागणार?पशुखाद्यासाठी लागणाऱ्या भातकोंंड्यासह इतर कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पशुखाद्याच्या दरात येत्या आठ दिवसांत वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
लाल मिरचीला मागणीच नाहीलाल मिरचीच्या खरेदीचा हंगाम सुरू होण्यास अजून वेळ असला तरी दर महिन्याला मिरची खरेदी करणारा वर्गही काही कमी नाही; पण यंदा लाल मिरचीला मागणीच नसल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.