कोल्हापूर : भारतमातेच्या रक्षणासाठी अनेक जवान आपल्या प्राणांची बाजी लावतात. त्यांच्या पश्चात शहीद जवानांच्या मुलांना दर्जेदार, उच्च शिक्षण मिळण्यासाठी शासकीय व खासगी शाळांत प्राधान्य देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा आर्मी सेंटरचे प्रमुख लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग यांनी रविवारी केले.टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे भारतीय सेनेतर्फे आयोजित माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ४००० माजी सैनिक उपस्थित होते. यावेळी वीरमाता व पत्नींचा सन्मान करण्यात आला.सिंग म्हणाले, सेवानिवृत्तीनंतर माजी सैनिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आर्मीच्या वतीने अद्ययावत दवाखाने सुरू आहेत. मात्र काही माजी सैनिकांना आरोग्याच्या कारणास्तव संबंधित दवाखान्यापर्यंत पोहोचण्यास अडचणी येतात. अशा माजी सैनिकांसाठी प्रथम राजस्थानमध्ये आर्मीच्या वतीने ‘मोबाईल (व्हॅन) हॉस्पिटल’ ही योजना सुरू केली आहे.
या मोबाईल व्हॅनमार्फत आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवितो. ही सेवा सध्या गोव्यात सुरू आहे. तिला प्रतिसाद पाहता ही योजना भविष्यात कोल्हापुरातही सुरू केली जाईल.मेजर जनरल प्रीती सिंग म्हणाले, माजी सैनिकांना एकत्र करून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. शेती, आरोग्य, पाणी, वीज यांसारख्या दैनंदिन गरजा या मेळाव्याच्या माध्यमातून सोडविल्या जाणार आहेत.
कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे रविवारी माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्यात जिल्ह्यातील वीरपत्नी व वीरमातांचा सन्मान करताना लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग. (छाया : नसीर अत्तार)
यामध्ये वीरपत्नी सुवर्णा संभाजी पाटील, संगीता विजय पाटील, शोभा लक्ष्मण आॅल्का, शर्मिला नारायण तुपारे, रूपाली महादेव तुपारे, सुवर्णा सुभाष कदम, छाया मारुती पाटील, रूपाली सुभाष भोळे, राजश्री कुंडलिक माने, अश्विनी सात्ताप्पा पाटील, पूनम प्रवीण येलकर, संगीता दशरथ जाधव, अलका क्रिष्णा रांजगाने, सुरेखा भाऊसो पोवार, अर्चना अर्जुन बिरंजे, जयश्री जयवंत चौगुले, मंगला अप्पाजी कदम, छाया शामराव शिंदे, मनीषा उत्तम देसाई, सुवर्णा शिवाजी मगदूम, वृषाली महादेव तोरस्कर आणि निर्मला गोपाल निउंगरे यांचा; तर शोभा माने, मनीषा सूर्यवंशी, सुलोचना पाटील, छाया इंगळे, यमुनाबाई बागडी, आक्काताई साबळे, यशोदा पाटील या वीरमातांचा सन्मान करण्यात आला.
कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे रविवारी माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्यात माजी सैनिकांशी संवाद साधताना लेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंग. (छाया : नसीर अत्तार)
दोन दिवस आरोग्य शिबिरया मेळाव्यात माजी सैनिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये विविध ठिकाणांच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून माजी सैनिकांची तपासणी करण्यात आली. हे आरोग्य शिबिर दोन दिवस सुरू राहणार आहे.
कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील १०९ इन्फंट्री बटालियन (प्रादेशिक सेना), मराठा एल आय, कोल्हापूर मिलिटरी स्टेशन येथे रविवारी माजी सैनिकांसाठी आयोजित मेळाव्यात माजी सैनिकांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.(छाया : नसीर अत्तार)
एस.टी. भरून माजी सैनिकमाजी सैनिक मेळाव्यासाठी काही गावांतून स्वतंत्र एस. टी. बसमधून माजी सैनिक कुटुंबीयांसोबत सकाळी येत होते. माजी सैनिकांना माहिती देण्यासाठी या मेळाव्यात बॅँक, महसूल, महावितरण, शेती अवजारे, दुचाकी व चारचाकी गाड्यांसह सुमारे तीसहून अधिक स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले होते. या ठिकाणी त्यांना त्यांना सविस्तर माहिती पुरविण्यात येत होती.सायंकाळी पाचपर्यंत हा मेळावा सुरू होता. यासह सर्वांसाठी जेवणाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.